(नवी दिल्ली)
मोबाईलचा अतिवापर विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत मारक ठरत आहे. कोरोना काळात शिक्षण तथा ऑनलाइन अभ्यासासाठी मुलांच्या हाती मोबाईल आले, पण आता ती मुलांची सवयच बनली आहे. त्यामुळे अनेक मुलांना मणका, डोळे, कान व मेंदूच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुलांमधील चिडचिडेपणा वाढला असून, अनेकजण मोबाईलशिवाय अभ्यास किंवा जेवण याकडेही लक्ष नसते, अशी स्थिती आहे. आता याबाबत पालकांनही जागरूक राहणे गरजेचे आहे. तसेच याचा थेट परिणाम विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संवादावर होत आहे. यातून शिक्षणाच्या मूळ हेतूवरच आघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शाळांमधून स्मार्ट फोन हद्दपार करण्याचा सल्ला युनेस्कोने नव्या अहवालातून जगाला दिला आहे.
अलिकडे तंत्रज्ञानाच्या साथीने मुलांचे भवितव्य घडविण्याचे काम सुरू आहे. खरे तर डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना खूप फायदा होत आहे. मात्र, याचा थेट परिणाम विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संवादावर होत असल्याचे मत युनेस्कोने आपल्या अहवालात मांडले आहे. युनेस्कोच्या ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट या अहवालात मुलांकडून लहान वयापासून होत असलेल्या स्मार्टफोन वापरावर चिंता व्यक्त करण्यात आली.
युनोस्कोच्या शिक्षण, विज्ञान आणि संस्कृती शाखेचे म्हणणे आहे की, मोबाईलवर बंदी घातल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सुधारणा होईल. यातून ऑनलाइन शोषणदेखील टाळता येईल. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शिक्षणावर वाईट परिणाम होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय बराच वेळ मोबाइल पाहत राहिल्याने त्यांच्या मानसिक स्थितीवरही परिणाम होत आहे, असे युनेस्कोचे महासंचालक ऑड्रे अलोजा यांनी म्हटले आहे. मोबाईलचा वापर शिकण्याचा अनुभव वाढवण्यासाठी आणि विद्यार्थी आणि शिक्षकांच्या फायद्यासाठी केला पाहिजे, त्यांचे नुकसान होऊ नये. विद्यार्थ्यांच्या गरजांना प्राधान्य देतानाच शिक्षकांनाही साथ दिली पाहिजे, असेही युनोस्कोने म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्राची संस्था असलेल्या युनोस्कोने डिजिटल शिक्षणात अफाट क्षमता असली तरी ते शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील प्रत्यक्ष संवादाची जागा घेऊ शकत नाही, असे मत व्यक्त केले. युनोस्कोने स्मार्टफोन आणि शिक्षण यासंदर्भातील अहवालात आपले परखड मत मांडले. कोणतेही तंत्रज्ञान शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील प्रत्यक्ष संवादाची जागा डिजिटल तंत्रज्ञान कधीच घेऊ शकत नाही. शिक्षण मानव केंद्रित असायला हवे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कोणत्याही प्रकारच्या डिजिटल तंत्रज्ञानाकडे शिक्षणातील सहाय्यक घटक म्हणून पाहायला हवे, असेही युनोस्कोने म्हटले आहे.
डिजिटल शिक्षणाचा फायदा आहे. मात्र, त्यामुळे शिकताना वर्गामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवादामध्ये येणारा व्यत्यय टाळण्यासाठी आणि सायबर गुन्ह्यांपासून विद्यार्थ्यांचे रक्षण करण्यासाठी शाळांमधून स्मार्टफोन आणि मोबाईलवर बंदी आणली पाहिजे, असे आवाहन युनेस्कोने या अहवालात केले आहे. या अहवालात केलेल्या आवाहनाचे अनेक देशांतून स्वागत होताना दिसत आहे. युनेस्कोच्या या अहवालाचे शिक्षण क्षेत्र आणि शिक्षण तज्ज्ञांनीही स्वागत केले आहे. डिजिटल एज्युकेशन आणि विद्यार्थी-शिक्षक संवाद यातून सुवर्ण मध्य काढला पाहिजे, असे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.