(संगमेश्वर/प्रतिनिधी)
मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वरात चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या चौपदरीकरणा दरम्यान दरडी कोसळून रस्त्यावर येऊ नयेत म्हणून संरक्षक भिंत घालण्यात आलेल्या आहेत. मात्र या संरक्षण भिंतीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून दोन महिन्यापूर्वी बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंती पहिल्या पावसातच कोसळत आहेत. काय ता रस्ता…काय ती संरक्षक भिंत… सगळ कस एकदम बकवास ! अस आता सर्वसामान्यांमधून बोलल जात आहे.
संगमेश्वर ते बावनदी दरम्यान कटाई करून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या चौपदरीकरणाचे काम हे अत्यंत संथ गतीने सुरु आहे. या चौपदरीकरण दरम्यान महामार्गाच्या डोंगर कटाईमुळे दरडी कोसळू नयेत यासाठी संरक्षण भिंती उभारण्यात येत आहेत. आंबेड बुद्रुक येथे 1-2 महिन्यापूर्वी बांधण्यात आलेली संरक्षक भिंतीवर मोठी दरड खाली आल्याने ही भिंत मुळ जागेवरून सरकून 2-3 फूट बाहेर रस्त्याजवळ आली आहे. जवळपास 20-25 फुटाची ही संरक्षक भिंत आहे. अशा प्रकारचे निकृष्ट दर्जाचे काम या महामार्गावर चालू आहे. संरक्षक भिंती या दरडीपासून बचाव करण्यासाठी बांधल्या जातात, परंतू या ठिकाणी बांधलेली भिंत मातीच्या भरावाने सरकल्याने व तडे गेल्याने कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत आहे. या संरक्षण भिंतीलाच संरक्षणाची गरज असल्याचे दिसून येत आहे, असा आरोप धामणी येथील संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष परशुराम पवार यांनी केला आहे. तसेच अशाच प्रकारचीं मोठी दरड कुरधुंडा येथेही कोसळली आहे. या ठिकाणचीही संरक्षक भिंत भरावाने झाकोळली गेली आहे. तिथेही हीच अवस्था झाली आहे.
याबाबत पुढे बोलताना परशुराम पवार म्हणाले, सर्वसामान्यांच्या पैश्यांचा अशाप्रकारे गैरवापर केला जात आहे. आम्ही वारंवार ठेकेदार असलेल्या एम. जे. म्हात्रे या कंपनीच्या कामाबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार, संगमेश्वर पोलिस निरीक्षक यांचेकडे तक्रारी केल्या मात्र याचा काहीच उपयोग झाला नाही. हे सर्व अधिकारी आम्हालाच गप्प करण्याचा प्रयत्न करतात. निकृष्ट कामाविषयी बोललो तर खोट्या केसेसमध्ये अडकवून खटला दाखल करू अशा प्रकरची धमकीच दिली जात आहे, असेही परशुराम पवार यांनी म्हटले आहे.