(पोर्ट लुईस)
मॉरिशसमध्ये उभारण्यात आलेल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष, राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे शुक्रवारी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस हे सकाळी मॉरिशसमध्ये दाखल झाले होते. या कार्यक्रमाला मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथदेखील उपस्थित होते. १४ फुट उंचीचा हा पुतळा फायबर ग्लास मिडीयममध्ये तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मॉरिशियमधील हा सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. नाशिक येथील शिल्पकार विकास तांबट यांनी हा पुतळा तयार केला असून यासाठी तीन महिन्यांचा अवधी लागला आहे.
मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात फडणवीस म्हणाले, या पुतळ्याचे लोकार्पण करण्याचे भाग्य मला लाभते आहे. हा मला मोठा आनंद आहे. छत्रपती शिवराय फक्त राजे नव्हते, ते द्रष्टे होते. त्यांनी ज्याप्रमाणे राज्यव्यवस्था घडवली त्यात कोणताही भेद नव्हता. कोणालाही विशेष दर्जा नव्हता. चूक करणाऱ्यांना शिक्षा होती, चांगलं वागणाऱ्याला प्रोत्साहन होतं, असे ते म्हणाले.
त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष पृथ्वीराजसिंग रुपून यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर महाराष्ट्राचे शिष्टमंडळ सायंकाळी मॉरिशसमधील मराठी समुदायाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातही सहभागी झाले होते.
मॉरिशसमध्ये सुमारे ७५ हजार मराठी बांधव राहतात. यात प्रामुख्याने पुणे, सातारा आणि कोकण भागातून गेलेले बरेच मराठीजन आहेत. त्यांनी आपल्या मराठी परंपरा, संस्कृती जोपासली आहे. या मराठी बांधवांच्या विविध सुमारे ५४ संघटना असून, या सर्व संघटनांचा मिळून १ मे १९६० रोजी मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन स्थापन करण्यात आले आहे. याद्वारे ‘महाराष्ट्र दिन’, ‘शिवजयंती’, ‘गुढीपाडवा’, ‘गणेश चतुर्थी’ मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मॉरिशसमध्ये एक महाराष्ट्र भवन सुद्धा उभारण्यात आले आहे.