(मुंबई)
रायगडात आज ज्यांना मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठाची परीक्षा देता आली नाही त्यांच्यासाठी ही परीक्षा पुन्हा 22 जुलैला आयोजित करण्यात आली आहे. रायगडमध्ये बुधवारी मुसळधार पावसामुळे शाळा कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अशा परिस्थितीमध्ये जे विद्यार्थी मुंबई विद्यापीठाअंतर्गत झालेल्या परीक्षेला मुकले आहेत त्यांना एक दिलासादायक बातमी आहे. या विद्यार्थ्यांना 22 जुलैला पुन्हा आयोजित केलेल्या परीक्षेमध्ये सहभागी होता येणार आहे. त्यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान टळणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी आज परीक्षा दिली आहे त्यांना 22 जुलैच्या परीक्षेत पुन्हा सहभागी होता येणार नाही.
रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने बुधवारी झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेस जे विद्यार्थी पोहचू शकले नाहीत त्यांच्यासाठी दिनांक २२ जुलै २०२३ रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. अशा आशयाचे परिपत्रक मुंबई विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी प्रसिद्ध केले आहे. २२ जुलै २०२३ रोजी त्याच परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्यावतीने जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठाअंतर्गत असणाऱ्या महाविद्यालयांच्या एकूण नऊ परीक्षा होत्या. बुधवार, १९ जुलै २०२३ रोजी मुंबई विद्यापीठाच्या २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या सकाळच्या सत्रामध्ये आठ व दुपारच्या सत्रामध्ये एक अशा एकूण नऊ परीक्षा सुरू होत्या. रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असल्याने रायगड जिल्हाधिकाऱ्यानी दिनांक १९ जुलै २०२३ रोजी जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती.