(राजापूर / प्रतिनिधी)
बुधवारी गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी दोनच्या सुमारास जैतापूर आगरवाडी येथे जैतापूर पूलाखाली धाऊलवल्ली खाडीत मुळे (शिंपल्या ) काढण्यासाठी गेलेल्या ३८ वर्षीय तरूणाचा समुद्राच्या खाडीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. यातील मयत तरूणाचे नाव राजेंद्र अंकुश लासे (रा. दळे जैतापूर) असे आहे. सणाच्या दिवशी राजेंद्र याच्या झालेल्या आकस्मिक मृत्यूने अवघ्या जैतापूर परिसरावर शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास मुळे काढण्यासाठी खाडीत गेलेला राजेंद्र लासे हा तरूण सायंकाळपर्यंत परत न आल्याने त्यांचा ४५ वर्षीय भाऊ महेंद्र अंकुश लासे यांनी नाटेतील सागरी पोलिस स्थानकात भाऊ बेपत्ता झाल्याची खबर नोंदवली. त्यानंतर नाटे पोलिसांनी तपास हाती घेतला. त्याचा शोध सुरू असता खाडीच्या याचदरम्याने त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे राजापूर ग्रामीण रूग्णालयात विच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास नाटे सागरी पो. स्थानकाचे सहा.पो.निरीक्षक आबासाहेब पाटील करीत आहेत. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.