(मुंबई)
मुलुंड (पश्चिम), सेवालाल लालवाणी रोड, विठ्ठल नगरमधील तळमजला अधिक सात मजली जागृती सोसायटीमध्ये बुधवारी तळमजल्यावर असलेल्या कॉमन वीज मिटर बॉक्समध्ये अचानकपणे आग लागली. इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक केबल, वीज मिटर, स्वीचेस आदींना आग लागली होती. अग्निशामक दलाने इमारतीमध्ये अडकलेल्या ८० लोकांची सुखरुप सुटका केली. मात्र त्यापैकी १० जणांना धूर नाकातोंडात गेल्याने श्वसनाचा त्रास झाला. नजीकच्या अगरवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
इलेक्ट्रिक वायर, केबल लाईनला आग लागल्याने आणि ते जळाल्याने आगीचा काळाकुट्ट धूर संपूर्ण इमारतीमध्ये पसरला होता. या आगीची माहिती मिळताच इमारतीमध्ये एकच खळबळ उडाली. आगीमुळे इमारतीमधील फ्लॅट, लॉबी, टेरेस, जिन्यावर लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आदी जवळजवळ ८० रहिवाशी इमारतीत अडकून पडले होते. मात्र या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू करून सर्वांची सुखरूप सुटका केली. या बचावकार्यात १० लोक बेशुद्ध आढळले व जिना उतरण्यास असमर्थ होते. त्यांना जवळच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.