उदय सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. कुणीही दिवास्वप्नं पाहू नयेत. तसेच राष्ट्रवादीमुळं कुणीही नाराज नाही. जे कोण बातम्या पसरवत आहेत, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राने स्वीकारलं आहे. येणाऱ्या काळातील लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात होणार असल्याचं स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
सामंत पुढे म्हणाले, राष्ट्रवादीचे सरकारमध्ये विलीनीकरण हा राजकीय कार्यक्रम असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे घडल्या गोष्टीबाबत आमचा राग नाही. आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. राष्ट्रवादीला आघाडीत आणण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांना कळवल्यानंतर घेण्यात आला आहे.
#WATCH | Mumbai: Maharashtra Minister Uday Samant after Shiv Sena leaders meeting with Eknath Shinde concludes at Varsha bungalow, says, "Under the leadership of CM Eknath Shinde, there was a meeting regarding upcoming session of the Lok Sabha, the session of Maharashtra… pic.twitter.com/lBpRwcnDTq
— ANI (@ANI) July 5, 2023
या बैठकीत आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या अधिवेशनाच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. संघटना मजबूत करण्याबाबत चर्चा झाली. दररोज पक्षाच्या मुख्यालयात बसून जनतेचे प्रश्न सोडविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचे आणि एकत्रितपणे लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आगामी निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे, असे ते म्हणाले. भविष्यात शिवसेनेच्या राजकीय वाटचालीत अधिक आमदार कसे निवडून येतील आणि आमच्या संघटना बांधणीचा उपयोग या संपूर्ण महायुतीला झाला पाहिजे. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, असंही सामंत म्हणाले.
चुकीचा प्रचार, शिंदेंच मुख्यमंत्री असतील
दरम्यान, बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा अजिबात प्रश्नच उद्भवत नाही. विरोधकांकडून चुकीचा प्रचार केला जात आहे. आम्ही मोठ्या ताकदीने पुढील निवडणूकांसाठी तयार करणार आहोत, तशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. बोटावर मोजण्याइतके आमदार राहिलेल्या लोकांनी चुकीच्या अफवा पसरवू नये, असा सूचक इशारा देखील त्यांनी दिली.