(मुंबई)
सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या मागण्यांबाबत आक्रमक भूमिका घेत जलसमाधी आंदोलनाची घोषणा करणाऱ्या शेतकरी नेते रविकांत तुपकरांचे आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे. राज्य सरकारने त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. केंद्र सरकारशी संबंधित मागण्यांसाठी पाठपुरावा करू, तसेच सोयाबीन – कापूसप्रश्नी केंद्र सरकारशी चर्चा करण्यासाठी लवकरच राज्य सरकारचे शिष्टमंडळ घेऊन दिल्लीत जाऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी दिली.
हजारो शेतकऱ्यांची फौज घेऊन रविकांत तुपकर मुंबईत दाखल झाले होते. दरम्यान, सरकारने या आंदोलनाची दखल घेत तुपकरांना चर्चेचे निमंत्रण दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी तुपकर यांच्या मागण्या समजून घेतल्या. या वेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
सरकारने दिलेला शब्द येत्या १५ दिवसांत न पाळल्यास किंवा मान्य झालेल्या मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा मुंबईत येऊन आक्रमक आंदोलन केले जाईल, असा इशाराही तुपकर यांनी दिला आहे.