(हैदराबाद)
अटीतटीच्या लढतीत दिल्लीने हैदराबादचा सात धावांनी पराभव केला. सात सामन्यात दिल्लीचा हा दुसरा विजय ठरला तर हैदराबादचा सात सामन्यात हा पाचवा पराभव झाला आहे. हैदराबाद आणि दिल्ली या गुणतालिकेतील तळाच्या दोन्ही संघाचे आयपीएलमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. या दोन्ही संघाला आयपीएलमध्ये आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी उर्वरित सर्व सामन्यांत विजय मिळवावा लागणार आहे.
दिल्लीने दिलेल्या १४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ सहा विकेटच्या मोबदल्यात १३७ धावांपर्यंत मजल मारु शकला. दिल्लीकडून मुकेश कुमार याने अखेरचे षटक जबरदस्त टाकले. अखेरच्या षटकात हैदराबादला विजयासाठी १३ धावांची गरज होती, मुकेश कुमार याने या षटकात एकही चौकार न देता दिल्लीला विजय मिळवून दिला.
सुंदरने पहिल्याच चेंडूवर दोन धावा घेतल्या. यानंतर पुढचा चेंडू डॉट गेला. तिसऱ्या चेंडूवर मुकेशने एकेरी दिली. चौथ्या चेंडूवर यानसेनने एकच धाव घेतली. पाचव्या चेंडूवर मुकेशने एकेरी दिली. त्याचवेळी दिल्लीला शेवटच्या चेंडूवर ८ धावांची गरज होती, जी जवळपास अशक्य होती. शेवटच्या चेंडूवर मुकेशने एकही धाव दिली नाही. अशाप्रकारे दिल्लीने ७ धावांनी विजय मिळवला.
दिल्लीने दिलेल्या १४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात अतिशय खराब झाली. हॅरी ब्रूक सात धावा काढून तंबूत परतला. ३१ धावांवर हैदराबादला पहिला धक्का बसला. त्यानंतर मयंक आणि राहुल त्रिपाठी यांनी हैदराबादचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण इशांत शर्मा याने राहुल त्रिपाठी याला १५ धावांवर तंबूत पाठवले. त्यानंतर एका बाजूला मयंक अग्रवाल याने दमदार फलंदाजी केली. पण अक्षर पटेल याने मयंकची खेळी संपुष्टात आणली. मयंक याने ४९ धावांचे योगदान दिले. मयंक बाद झाल्यानंतर एडन मार्करम आणि अभिषेक शर्माही तंबूत परतले. अभिषेक शर्मा ५ तर एडन मार्करम तीन धावांवर तंबूत परतला. धक्क्यावर धक्के बसत गेल्याने अखेरपर्यंत सामना आपल्या बाजूने झुकवण्यात हैदराबादला अपयश आले.
हैदराबादच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. भुवनेश्वरने चार षटकांत ११ धावा देत दोन बळी घेतले. त्याचवेळी वॉशिंग्टन सुंदरने चार षटकांत २८ धावा देत तीन बळी घेतले. टी नटराजनने तीन षटकांत २१ धावा देत मिचेल मार्शची महत्त्वपूर्ण विकेट घेतली.