(रत्नागिरी)
मुंबई-गोवा महामार्ग अपूर्ण असतानाही शासनाने ओसरगाव येथील टोल नाक्यावरून या महामार्गावरील वाहतुकीसाठी टोल वसुली सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. आज दिनांक १ डिसेंबर २२ रोजी मध्यरात्री पासून ही टोल वसुली सुरू केली जाणार आहे. यात सिंधुदुर्ग पासिंगच्या नोंदणीकृत व्यावसायिक वाहनांसाठी शुल्कात ५० टक्के सवलत तर अवाणिज्य वाहनांना महिन्यासाठी ३१५ रुपयांचा पास असणार आहे. टोलनाका सुरू होत असल्याची अधिसूचना महामार्ग प्राधिकरणातर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
चौपदरीकरणाचे काम पुर्ण झालेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील वाटूळ ते झाराप दरम्यान असलेल्या दोन टोलनाक्यावर ही टोलवसुली केली जाणार आहे. त्यामुळे आता वाहन चालकांना या दोन्ही टोलनाक्यांवर टोल द्यावा लागणार आहे. राज्य महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात राजापुर तालुक्यात वाटूळ ते तळगाव व पुढे सिंधुदुर्ग जिल्हयात तळगाव ते कळमठ व पुढे कळमठ ते झाराप पर्यत महामार्गाचे काम पुर्ण झाल्याने प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे आता ही टोलवसुली केली जाणार असल्याचे महामार्ग विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
असे असणार आहेत टोल वसुलीचे नवे दर
मोटार, जीप, व्हॅन आणि इतर हलकी वाहने : ९० रुपये
मिनी बस आणि हलकी व्यावसायिक वाहने : १४५ रुपये
ट्रक आणि बस (२ ॲक्सल) : ३०५ रुपये
व्यावसायिक वाहने ३ ॲक्सलसाठी : ३३५ रुपये
मल्टी ॲक्सल ४ ते ६ ॲक्सल वाहनांसाठी : ४८० रुपये.
सात किंवा त्याहून जास्त ॲक्सल वाहनांसाठी : ५८५ रुपये
अवाणिज्य प्रकारच्या वाहनांसाठी ३१५ रुपये मासिक पास शुल्क
वसुलीचा ठेका राजस्थान येथील गणेशगढीया कन्स्ट्रक्शन कंपनीला दिला आहे. सिंधुदुर्ग हद्दीवरील खारेपाटण-राजापूर या दरम्यानचा हातीवले टोलनाकाही १ डिसेंबर २२ च्या मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे. येथील वसुलीचा ठेका सिंधुदुर्गातील गणेश मांजरेकर यांना दिला गेला आहे.
ओसरगाव टोल नाक्यावर यापूर्वी १ जून २२ पासून टोल वसुली होणार होती. त्यासाठी एमडी करिमुन्नीसा या कंपनीला ठेका दिला होता; मात्र प्रखर राजकीय विरोधामुळे ही कंपनी वसुलीची कार्यवाही करू शकली नव्हती. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने तीन महिन्यांसाठी नव्याने वसुलीच्या निविदा मागवल्या होत्या.