(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा ते निवळी यादरम्यान चौपदरीकरणाचे काम सुरू असलेला रस्ता खचला आहे. पहिल्याच मुसळधार पावसाने मुंबई गोवा महामार्गाला दणका दिला आहे. सद्यस्थितीत एका बाजूने वाहतूक सुरू असून काम सुरू आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच पावसात मुंबई-गोवा महमार्गावरील निवळी नजिक रंभोळकरीन देवस्थान येथे रस्ता खाचण्याची घटना घडली आहे. बुधवारी दिवसभर पावसाची संततधार कायम होती. महामार्ग चौपदरीकरणाचे काम या हद्दीतील एक वर्ष झाले संत गतीने सुरू आहे. दोन दिवस मुसळधार पावस पडून चौपदरीकरणासाठी टाकलेला भराव खचून रस्त्यावर मोठा खड्डा पडला होता. आधीच बराच काळ रखडलेल्या कामामुळे वाहनचालक त्रस्त आहेत. यातच रस्ता खचण्याच्या घटना घडत असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
बुधवारी रात्रीपासूनच रस्ता खचण्यास सुरुवात झाली होती. मात्र दुरुस्तीचे काम गुरुवारी सकाळी सुरू झाले आहे. सध्या खचलेल्या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने भराव टाकण्याचे काम सुरू असून एका बाजूची वाहतूक सुरू आहे. या खचलेल्या भागाच्या लगत मोठी खोल दरी आहे. संबधित कंपनीच्या नियोजनाअभावी या ठिकाणीं पावसाच्या पाण्याने रस्त्यावरूनच मार्ग काढला होता. पाऊसाचा जोर कायम राहिल्यास पुन्हा मातीचा रस्ता आणखी खचण्याची शक्यता आहे. यातून महामार्गावरील पूर्ण वाहतूक ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.