(रत्नागिरी)
अपघातग्रस्त दुचाकी चालकाची मदत करण्याच्या बहाण्याने त्याचीच दुचाकी लांबवली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना शुक्रवार १६ जून रोजी रात्री ११ वा. मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा तिठापासून पुढे पालीच्या बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.
याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, १६ जून रोजी रात्री ते आपल्या ताब्यातील दुचाकी (आरजे – १९ – व्हीएस-५५५९) घेऊन गयाळवाडी ते इचलकरंजी असे जात होते. ते हातखंबा तिठ्याच्या पुढे साधारण ५०० मिटर अंतर पुढे गेल्यावर त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी घसरून अपघात झाला. अपघात झाल्यामुळे फिर्यादी हे रस्त्याच्या साईडला बसलेले असताना दोन संशयित तिथे आले. त्यांनी फिर्यादींना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांची स्लिप होऊन पडलेली दुचाकी उचलण्याच्या बहाण्याने चोरून नेली. याप्रकरणी फिर्यादीने रविवार २५ जून रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.