(मुंबई)
मुंबई उच्च न्यायालयाला सहा नवे न्यायमूर्ती लाभणार असून न्यायमूर्तींची संख्या आता ६१ वरून ६७ होणार होणार आहे. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर केंद्र सरकारकडून न्यायमूर्तीपदावरील नव्या नियुक्तींची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संजय आनंदराव देशमुख, शिवराज गोपीचंद खोब्रागडे, महेंद्र वाधुमल चांदवानी, अभय सोपानराव वाघवसे, रवींद्र मधुसुदन जोशी आणि वृषाली विजय जोशी यांची हायकोर्टात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्तीसाठी राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आहे.
एकंदरीत न्यायालयीन कामकाजाचा ताण कमी होऊन प्रकरणे लवकरात लवकर निकाली लागण्याच्या दृष्टीने मदत होणार आहे. उच्च न्यायालयात सध्या ६१ न्यायाधीश आहेत. त्यातील ४३ स्थायी न्यायाधीश आणि १८ अतिरिक्त न्यायाधीश आहेत. ही न्यायाधीशांची संख्या अलाहाबाद उच्च न्यायालयानंतर देशातील दुस-या क्रमांकाची आहे. येथे न्यायालयाची मंजूर संख्या ९४ आहे. आता या ६ न्यायमूर्तींनी न्यायाधीशपदाची शपथ घेतल्यावर उच्च न्यायालयाचे एकूण संख्याबळ ६७ होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून संतोष चपळगावकर आणि मिलिंद साठ्ये या दोन वकिलांच्या नावांची शिफारस केली होती. परंतु केंद्र सरकारने त्यांची नावे अद्याप स्पष्ट केलेली नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारसही केली होती. तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांची कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस केली होती. न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि प्रसन्न वराळे यांच्या या नियुक्त्या केंद्र सरकारने मंजूर केल्यानंतर आणि त्यासाठी अधिसूचना जारी केल्यानंतर होण्याची शक्यता आहे.