(प्रतिनिधी/ रत्नागिरी)
मडगाव ते मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेसने मुंबईत नाटकाचा शो करण्यासाठी जात असलेल्या वृध्दाचा अचानक मृत्यू झाल्याची घटना चिपळूण पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. मारिओ पियादाद मिनीझीस (65, चिनचिननीम, पश्चिम गोवा) असे मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद मित्र मॅक्सी फ्रान्सको पेरेरा (58, वास्को द गामा, गोवा) यांनी दिली. ही घटना 25 जून रोजी रात्री 12.30 वा. च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारिओ मिनीझीस आणि मॅक्सी पेरेरा हे दोघे मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेसने मुंबईला नाटकाच्या शो साठी जात होते. चिपळूण रेल्वे स्थानकावर आल्यानंतर मिनीझीस यांच्या डोक्यात व छातीत दुखू लागले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी गेल्यानंतर डॉक्टरांनी तपासाअंती मिनीझीस यांना मृत घोषित केले. याबाबतची फिर्याद मॅक्सी ने दिल्यानंतर चिपळूण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.