(मुंबई)
मानखुर्दहून ठाण्याला जाणाऱ्या मुंबईकरांची आता वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. घाटकोपर छेडानगर चौकातील मानखुर्द-ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपूलाचे गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उड्डाणपूलामुळे घाटकोपरमधील छेडानगर परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्येतून वाहनचालक-प्रवाशांची सुटका होणार आहे. हा उड्डाणपूल 1235 मीटर लांबीचा आहे. चेंबूरकडून ईस्टर्न फ्री वेला जोडणाऱ्या छेडानगर जंक्शन येथे MMRDA द्वारे बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. या उड्डाणपुलामुळे मुंबईहून ईस्टर्न फ्री वेमार्गे ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांची ट्रॅफिकमधून सुटका होणार आहे.
छेडानगर जंक्शन परिसरातील मानखुर्द आणि ठाण्याला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे उद्घाटन झाल्याने त्याचा फायदा प्रवास करणाऱ्या सर्वांना होणार आहे. छेडानगर चौकामध्ये होणाऱ्या वाहतुकीमध्ये सर्वात जास्त प्रमाण मानखुर्द- ठाणे दिशेकडील वाहतुकीचे आहे. सदर उड्डाणपुलामुळे मानखुर्द-ठाणे दिशेकडील वाहतूक सिग्नल मुक्त होणार आहे. मानखुर्द-ठाणे दिशेकडील वाहतूक सिग्नल मुक्त झाल्याने इतर दिशेकडील वाहतुकीस अतिरिक्त कालावधी उपलब्ध होणार असून त्या दिशेकडील वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.