(मुंबई)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ’मन की बात’ कार्यक्रमाप्रमाणेच राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही ’मन की बात’ उपक्रम राबविणार आहेत. ’मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाद्वारे ते लवकरच जनतेशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम महिन्यातून दोन वेळा प्रसारित होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा रेडिओवरील प्रयोग यशस्वी ठरला. त्याच धर्तीवर ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ हा कार्यक्रम असेल. हा कार्यक्रम महिन्यातून दोनदा आणि वर्षातून 24 वेळा प्रदर्शित होणार आहे. दूरचित्रवाहिन्या आणि रेडिओवर नव्या स्वरूपातील हा कार्यक्रम दाखवला आणि ऐकवला जाईल. यासाठी ई-निविदा प्रसिद्ध करून संस्थेची निवड करण्याची प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. त्याबाबतचा शासननिर्णयही झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या सभा विविध जिल्ह्यांमध्ये घेत आहेत. त्यासभेअंतर्गत सरकारी योजनांचा आढावा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून केला जातो. ‘शासन आपल्या दारी’ या ट्रिपल इंजिन असलेल्या राज्य सरकारच्या उपक्रमाला राज्यभर चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे संवादाचा पुढचा टप्पा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ असे म्हणत जनतेच्या प्रश्नांना सामोरे जाणार आहेत. विविध स्तरांतील नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत.
दरम्यान, यापूर्वीही एकदा अशाप्रकारचा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न झाला होता. 2017 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या डीडी सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रमातून थेट राज्यातील शेतकर्यांशी व नागरिकांशी संवाद साधला होता. हा कार्यक्रम 5 ऑक्टोबर 2017 रोजी सह्याद्री वाहिनीसह विविध मराठी वृत्तवाहिन्यांवरून प्रक्षेपित झाला होता. ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ची सुरुवात शेतकर्यांशी संवाद साधून झाली होती. कार्यक्रमापूर्वी राज्य सरकारने या कार्यक्रमात कोणत्या प्रश्नांना उत्तरे हवी, यासाठी जनतेकडून प्रश्नांची मागणी केली होती. व्हॉट्सअॅपवरून सुमारे 18 हजार प्रश्न-सूचना आल्या, तर 1,250 ई-मेल आले होते. त्यातील महत्त्वाच्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली होती. राज्याच्या विविध भागांतून 30 शेतकर्यांना या कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंगसाठी मंत्रालयात बोलावण्यात आले होते. मात्र, हा कार्यक्रम पहिला व अखेरचा ठरला. पण आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाला सुरुवात होत असून, त्याला जनता कसा प्रतिसाद देते हे लवकरच समजणार आहे.