(मुंबई)
आगामी निवडणुकीनंतर नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे हा आपला संकल्प आहे, मोदींना पंतप्रधान बनवणे हे भाजपसाठी नाही भारतासाठी महत्वाचे आहे, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भाजप हा मोठा भाऊ आहे त्यामुळे आवश्यकतेप्रमाणे त्याग करावा लागेल, असेही ते म्हणाले. भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. तर इंडिया आघाडीमध्ये एकही राष्ट्रीय नेता नाही, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.
प्रदेश पदाधिकारी बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. २०२४ च्या लोकसभेच्या तयारीसाठी सर्वांनी एकदिलाने कामाला लागा. आपली जबाबदारी समजून कामे केली पाहिजेत. तीन पक्षाचे सरकार आहे. भाजप मोठा भाऊ आहे. मोठ्या भावाने लहान भावाला सांभाळायचे असते, असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.
फडणवीस पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांची इंडिया आघाडी आपल्याला लढा देऊ शकत नाही, लोक ज्यावेळी मोदींजीचा विचार करतात त्यावेळी राहुल गांधी यांच्या बाबत लोकांच्या मनात ते लढा देऊ शकत नाही हे पक्के आहे. इंडिया आघाडीत आपआपसात वाद आहे. आता पासून यांची स्थिती अशी आहे की हे एकत्र राहू शकत नाही. यांच्यातील एकही जण राष्ट्रीय नेता नाही. जो मोदीजींना तोंड देऊ शकेल. तसेच, अटल बिहारी वाजपेयी यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम मोदीजी करत आहे. मिशन 2024 हे भाजप पेक्षा भारतासाठी महत्वाचे आहे.
फडणवीस म्हणाले की, मागील 9 वर्षात भारत बदलला आहे, भारतात गरिबीतून लोक वर आले हे युनायटेड राष्ट्राने सांगितले. ते म्हणाले की, ज्या भारतातला कुपोषितांचा देश म्हटले जात होते, त्याचे परिवर्तन 9 वर्षात झाले. भारताने प्रगतीचा वेग वाढवला आहे. माझ्या पुढच्या टर्ममध्ये देशाची अर्थव्यवस्था विस्तारून दाखवीन, असे मोदीजी म्हणाले. अर्थव्यवस्थेचा विस्तार होतो तेव्हा आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असतो. मोदीजींचे खंबीर नेतृत्व यामुळे हे संभव झाले आहे. जगाच्या पाठीवर जे देश आहेत ते भारताच्या पाठीमागे येताना दिसत आहेत, असेही फडणवीस म्हणाले.
जगाच्या पाठीवर आपले मोदीच बॉस
आपल्या बाजूच्या देशाची अवस्था अत्यंत वाईट आहे. श्रीलंका, बांगलादेश या सर्व देशाना आपली मदत घ्यावी लागते. जगाच्या पाठीवर आपल्या पंतप्रधान यांना बॉस म्हटले जाते. मोदींजीनी जो भारत तयार केला त्याशिवाय आता कुणाचे चालणार नाही. म्हणून आपल्या पाठीशी सर्व उभे आहे. काही शक्ती यामुळे घाबरल्या आहेत. ही वाटचाल कशी थांबवता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत. आपल्या देशातील काही जण त्याला बळी पडत आहेत, असेही फडणवीस पुढे म्हणाले.