(संंगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील दाभोळे मालपवाडी येथे मिऱ्या-नागपूर हायवेचे काम करताना ब्लास्टिंगचे काम जोरदारपणे सुरू आहे. मात्र आजूबाजूला लोकांची घरे असल्याने धोका पोहोचू शकतो. या ठिकाणी आठ ते दहा फुटाचे ब्लास्टिंग करण्यात येत आहे. हे ब्लास्टिंगचे काम सोमवारी (दिनांक 6 नोव्हेंबर 2023) रत्नागिरी शिवसेना ठाकरे गटाचे युवानेते बापू शिंदे यांनी रोखले होते.
ब्लास्टिंग करत असलेल्या ठिकाणी नजीकच ग्रामस्थांची घरे व दाभोळे ग्रामपंचायतीची नळपाणी पुरवठा योजनेची पाण्याची टाकी आहे. कंपनी जलत गतीने काम होण्यासाठी ब्लास्टिंग करत आहे. परंतु येथील घरांना व पाण्याच्या टाकीला भविष्यात भेगा पडून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच जीवितहानी देखील होऊ शकते. त्यामुळे तेथील ग्रामस्थांनी रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व ठाकरे गटाचे साखरपा येथील युवानेते प्रशांत उर्फ बापू शिंदे यांच्याशी संपर्क साधला. या घटनेची दखल घेत बापू शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संबधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला.
मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांचे नुकसान होऊन जीवितहानी देखील होऊ शकते. या रस्त्याचे काम झाले पाहिजे परंतु कोणतेही नुकसान न करता होणे अपेक्षित आहे. असे बापू शिंदे यांनी म्हटले आहे. याप्रकरणी संंगमेश्वर तालुका महसूल विभाग यांनी त्वरित लक्ष घालून संबधित कंपनीला योग्य त्या सूचना द्याव्यात अशी मागणी देखील तहसिलदार श्रीम. अमृता साबळे यांच्याकडे केल्याचे बापू शिंदे यांनी सांगितले.
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
एखाद्या भुकंपाप्रमाणे मोठया प्रमाणात होत असलेल्या ब्लास्टींगमुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मोठ्या प्रमाणावर बसणाऱ्या हादऱ्यांमुळे नागरीकांची घरे कमकुवत होण्याची शक्यता आहे. ब्लास्टींग करताना शासनाचे सर्वच नियम धाब्यावर बसवले जातायत का? क्षमतेपेक्षा अधिक स्फोटाकांच्या प्रमाणाचा वापर केला जातोय का? याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना पाहायला मिळत आहे.
काळा दगड मशीनद्वारे फोडण्याची मागणी
ब्लास्टींगच्या जबरदस्त हादऱ्यामुळे नागरिकांना कोणताही धोका पोहोचू नये याची खबरदारी काम करणाऱ्या कंपनीने व प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेणे आवश्यक आहे. महामार्गाचे काम करताना काळा दगड मशीनद्वारे अथवा सौम्य सुरुंगानी फोडण्यात यावा अशी मागणी बापू शिंदे यांनी केली आहे. यावेळी मुन्ना महाडिक, जयवंत पाटील व मालपवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.