( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
शहरानजीकच्या मिरजोळे पाटीलवाडी येथील गावठी हातभट्टीवर शहर पोलिसांनी धडक कारवाई करत 3 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जागीच नाश करत हातभट्टी उध्वस्त केली. ही कारवाई शुक्रवार 25 नोव्हेंबर रोजी करण्यात आली.
शहर पोलिसांना मिरजोळे येथे विनापरवाना गैरकायदा गावठी दारुची हातभट्टी सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.त्यानुसार,पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्या मार्फत संयुक्तरित्या हा छापा घालण्यात आला होता.या छाप्यामध्ये शिवजीत सुनिल पाटील (24,रा.मिरजोळे पाटीलवाडी,रत्नागिरी) याला जागीच दारु गाळत असताना ताब्यात घेण्यात आले.तसेच दारुभट्टी करता लागणारे साहित्यव 40 लिटर गावठी दारु,200 लिटर क्षमतेचे 60 बॅरल,12 हजार लिटर रसायन असे सर्व मिळून 3 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जागीच जाळून नष्ट करण्यात आला.
या कारवाईत उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे,शहर पोलिस निरीक्षक विनित चौधरी,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाणे पथक,स्थानिक गुन्हे शाखा पथक व क्यु.आर.टी पथक यांनी सहभाग घेतलेला होता.