(मुंबई)
राज ठाकरेंनी आपल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात माहिमच्या समुद्रातील दर्गा हा अनधिकृत असल्याचा व गेल्या दोन वर्षात हे अतिक्रमण केल्याचा आरोप पुराव्यासह केल्यानंतर याची दखल मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतली आहे. माहिममधील या दर्ग्याची पाहणी करून त्यासंबंधित अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिले आहेत. या दर्ग्यावर एका महिन्यात कारवाई केली नाही तर त्याच्या बाजूला गणपतीचं सर्वात मोठं मंदिर बांधणार असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं. त्यानंतर माहीम समुद्रकिनाऱ्यावरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
राज्यकर्ते, प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्यास काय होऊ शकते, हे लक्षात घ्या असे आवाहन राज ठाकरे यांनी उपस्थितांना केले. एकदा माहीम समुद्रात लोकांची गर्दी दिसली. त्यावेळी समुद्रात कसली गर्दी आहे, अशी विचारणा एकाला केली. त्यानंतर त्याने ड्रोन फूटेज पाठवले. त्यात हे बांधकाम सुरू असल्याचे उघड झाले. हे अनधिकृत बांधकाम माहीमच्या मकदूम बाबाच्या दर्ग्यापासूनच्या किनाऱ्यापासून जवळ आहे. त्या ठिकाणी पोलीस स्टेशनदेखील जवळ असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
समुद्राच्या आतील भागात बांधकाम असल्याने सदर अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेच्या हद्दीत येत नसल्याचं मुंबई महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात कारवाईचे अधिकार आहेत. मुंबई महापालिका आयुक्त हे मुंबई पोलीस आयुक्त त्यासोबतच मुंबई जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून कारवाई संदर्भात निर्णय घेतील, असे सांगण्यात आले आहे.
राज ठाकरेंनी सभेत दाखवलेल्या ड्रोन फुटेजमध्ये माहिमच्या समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर पाण्यातून काही माणसं चालत जात असल्याचं दिसतं. समुद्रात एका खडकावर एक कबर उभारण्यात आली आहे. त्याठिकाणी दोन हिरवे झेंडेही दिसत आहेत. दोन वर्षापूर्वी तेथे काहीच नव्हते याचे सॅटेलाइट फोटो आपल्याकडे असल्याचे राज ठाकरे म्हणाले.