(संगमेश्वर / वार्ताहर)
गेले अनेक दिवस संगमेश्वर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांच्याबाबत तक्रारी येत आहेत. या तक्रारीवरून अधिकाऱ्यांकडे माहिती मागणी केल्यावर कोणताही प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर व दिरंगाई कायदा अधिनियम 2006 प्रमाणे माहिती देण्यासाठी केलेल्या दिरंगाई बद्दल कार्यवाही करण्याची मागणी आर टी आय कार्यकर्ता महासंघाच्या संगमेश्वर तालुक्याच्यावतीने करण्यात आली आहे.
अनेक विषयाबाबत दक्ष नागरिक, संस्था या माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये व इतर अर्जाने माहिती मिळवण्यासाठी अर्ज करत असतात. या अर्जावर माहिती देण्यासाठी वेळकाढूपणा केला जातो. तसेच वरिष्ठ पातळीवरून माहिती व तक्रार असलेल्या संबंधित ग्रामपंचायत तसेच कर्मचारी यांच्यावर चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याबाबत संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आदेश देण्यात येतात. मात्र वरिष्ठांच्या आदेशालाही गट विकास अधिकारी केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र आहे. इतकं सर्व घडत असतानाही या अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही? मनमानी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना नेमके पाठीशी कोण घालत आहे? असे संतप्त सवाल आता उपस्थित होत आहेत.
माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र चे संगमेश्वर तालुक्याचे वतीने तसेच युवा एकता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तक्रार अर्ज दाखल करण्यात आले. मात्र गट विकास अधिकारी महोदयांनी कायम संबंधित नागरिकांना सहकार्य केले नसल्याची बाब उघड होत आहे. त्यांच्या अर्जाना केराची टोपली दाखवली आहे. तक्रार आर्जाच्या प्रती जिल्हाधिकारी महोदय, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.रत्नागिरी) यांना पत्र व्यवहार करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने आच्छर्य व्यक्त केले जात आहे.
शासन व प्रशासन पारदर्शक, जबाबदारीने चालावे हा उद्देश माहिती अधिकार या कायद्याचा आहे. हा कायदा लागू होवून 18 वर्षे झाली असून गैरप्रकार या कायद्यामुळे उघड झाले आहे. सामान्य माणसाला त्याच्या नागरिक म्हणून असणाऱ्या शक्तीची जाणीव करुन देणारा व सामान्य माणसाला न्याय देणारा हा कायदा असल्याचे सांगितले जाते. अनेक तक्रारीवरून असे लक्षात येईल की, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांनी वारंवार आपल्या कर्तव्यात कसूर करीत आहे. या अधिकाऱ्यांच्या अनेक तक्रारी आर टी आय कार्यकर्ता महासंघ प्राप्त झाल्या आहेत. या अधिकाऱ्यांना भानावर आनावे लागेल. येत्या काही दिवसांत जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहोत. या भेटीत कार्यवाही करण्यासंदर्भात योग्य निर्णय होणे अपेक्षित असल्याचे आर टी आय कार्यकर्ता महासंघाचे संगमेश्वर तालुका अध्यक्ष मनोहर गुरव यांनी सांगितले आहे.