(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड, नेवरे, धामणसे, सैतवडे आदी परिसरात गणेशोत्सवाची चाहूल लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गणेशचित्र शाळांमध्ये गणपती मूर्त्यांची बुकिंग करण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. कोकणातील महत्त्वाचा मानला जाणारा गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून अनेक गणपती चित्र शाळेत आपापल्या घरगुती गणपती मूर्त्यांचे चित्र कशा पद्धतीचे पाहिजे हे सांगण्यासाठी येथील स्थानिक ग्रामस्थ दररोज गर्दी करताना दिसत आहेत.
तसेच आपआपला गणपतीचा पाठ देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून येत आहे. याबाबत धामणसे येथील गणेश चित्रशाळेचे मालक विजय निवेंडकर यांच्याजवळ संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सध्या त्यांच्या चित्र शाळेत दोनशेहून अधिक वेगवेगळ्या आकाराचे गणपतींच्या मूर्ती आकार घेत असून अगदी बाराशे रुपयांपासून सुमारे दहा हजारांपर्यंत गणपती मूर्ती उपलब्ध आहेत. सध्या गणपती मूर्ती बनविण्याची माती महाग झाल्याने यावर्षी गणपतीच्या मूर्तींची किंमत थोड्याफार प्रमाणात वाढली आहे .सध्या गणपती काढण्याचे काम चालू असून काही दिवसानंतर रंगवण्याचे काम चालू होईल. गणपती काढताना गणपतीची कलाकुसर करणे ही मोठी मेहनत असून एका दिवसात सुमारे तीन ते चार गणपती मूर्ती तयार होतात.तसेच दीड फुटापासून साडेचार पाच फुटापर्यंत गणपती मूर्ती काढण्यात येतात .
गणेशोत्सव काही दिवसांवर येत असल्याने सध्या गणपतीपुळे आणि परिसरातील ग्रामस्थांना गणेशोत्सवाचे वेध लागले असून आपल्या गणपतीसाठी कोणकोणती आरास करायची याचीही बांधणी सध्या चालू आहे.