(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील एका शिक्षिकेने तळ्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. मालगुंड रहाटागर येथील विजय साळवी यांच्याकडे पाटील नामक दांपत्य भाड्याने राहत होते. पाटील दांपत्य व्यवसायाने दोघेही मालगुंड येथील एका हायस्कूलमध्ये शिक्षक होते. या दांपत्याचे मुळ गाव मुक्काम पोस्ट बेंद्री तालुका तासगाव जिल्हा सांगली असे आहे.
आत्महत्या केलेल्या पत्नीबाबत शिक्षक म्हणून नोकरी करीत असलेल्या जयवंत महादेव पाटील वय 44 वर्षे यांनी जयगड पोलीस ठाण्यात खबर दिली. सौ सविता जयवंत पाटील व 40 वर्षे असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. सविता या शिक्षिका असल्याने अकरावी व बारावी वर्गाचे शिकवणे कठीण जात असल्यामुळे वैयक्तिक नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्यांनी आत्महत्या केल्याची घटना मालगुंड रहाटागर शिंपी तलाव येथे आज (शनिवारी 3 फेब्रुवारी रोजी) सकाळी सव्वा नऊ वाजता घडली.
यावेळी तळ्याच्या पाण्यात तरंगताना सविता पाटील या दिसून आल्या. त्यानंतर त्यांना येथील ग्रामस्थांच्या मदतीने पाण्याच्या बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे नेले असता येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मधुरा जाधव यांनी मयत घोषित केले. यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रत्नागिरी येथे जिल्हा रुग्णालयात येथे पाठविण्यात आला आहे.
याबाबत अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप साळवी, पोलीस नाईक जयेश किर ,निलेश गुरव आदी करत आहेत आहेत.