(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड जोशीवाडी येथील श्री चंडिका जाखडी नृत्य कलापथकाचा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मालगुंड जोशीवाडी येथील श्री चंडिका जाखडी नृत्य कलापथकाच्या वतीने मालगुंड दशक्रोशीतील नामवंत शाहिर व जाखडी नृत्य कलापथकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मालगुंड धावडेवाडी येथील संघर्ष जाखडी कला नृत्य पथकाचे प्रमुख शाहिर संतोष गोताड यांचा यथोचित सन्मान मालगुंड जोशीवाडी येथील श्री चंडिका जाखडी नृत्य कला पथकाचे प्रमुख संस्थापक तथा अध्यक्ष दत्ताराम उर्फ बावा आग्रे यांचे हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला.
मालगुंड धावडेवाडी येथील संघर्ष जाखडी कला नृत्य पथकाचे प्रमुख शाहीर संतोष गोताड यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या संघर्ष जाखडी नृत्य कलापथकाच्या माध्यमातून शाहीर म्हणून आपली कला जनमानसात सादर करून नावलौकिक मिळवले आहे.तसेच त्यांनी अनेक ठिकाणच्या नामवंत शाहिरांबरोबर शक्ती- तुऱ्याचा जंगी सामना करताना आपल्या शाहीरी गायनाची छाप उमटवली आहे . त्याचबरोबर अनेक शक्ती तुऱ्याच्या जंगी सामन्यांमधून त्यांनी आपल्या प्रबोधनात्मक गाण्यांच्या आधारे लोकप्रबोधन करण्याचे काम करून आपल्या सुमधुर आवाजाने अनेक रसिकप्रेक्षकांच्या मनावर आपले नाव कोरले आहे.
कोकणच्या लोककलेतून प्रबोधन करणाऱ्या शाहीर संतोष गोताड यांचा सन्मान मालगुंड जोशीवाडी येथील श्री चंडिका जाखडी नृत्य कलापथकाने केल्याने मालगुंड धावडेवाडी संघर्ष जाखडी नृत्य कलापथकाच्या सर्व सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच सर्व स्तरातून संतोष गोताड यांचे विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे