जाकादेवी / वार्ताहर-
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावातील मयेकर कुटुंबातील वर्धमान सन्मान मयेकर या ५ वर्षीय बाल कलाकाराने झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला, या अत्यंत प्रसिद्ध सीरियलमध्ये बंड्याची भूमिका अतिशय यशस्वीपणे साकारली असून वर्धमानच्या देखण्या अभिनयाला मालगुंडसह संपूर्ण तालुक्यातून अनेक प्रेक्षकांनी चांगली दाद दिली आहे.
वर्धमान मयेकर हा जीजीपीएस रत्नागिरी विद्यालयात जुनियर के.जी. वर्गात तो शिकत आहे. अतिशय तल्लख बुद्धीमत्ता असलेला मुलगा म्हणून तो ओळखला जातो. प्रचंड स्मरणशक्ती व शिक्षणाविषयी प्रचंड ओढ तर आहेच शिवाय अभिनयाचीही चांगली जाण असलेला हा बालकलाकारआहे. भविष्यात पायलट होण्याची इच्छा कु.वर्धमानने बोलून दाखवली. पायलट व डॉक्टर या दोन्ही क्षेत्रात त्याने रस असल्याचे आत्मविश्वासपूर्वक सांगितले. वर्धमान हा अतिशय वक्तशीर व प्रचंड धाडसी बालकलाकार आहे. कुठलाही प्रश्न विचारला असता तात्काळ उत्तर देण्याचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे.
या बालकलाकाराला वर्धमानचे वडील सन्मान व आई समृद्धी यांबरोबरच त्याचे पप्पाआजोबा बंधू मयेकर व मम्मीआजी प्रियदर्शनी मयेकर यांची प्रबळ प्रेरणा मिळाली, तर मराठी प्रसिध्द व जाणकार अभिनेते ऋषिकेश दळी यांनी या बालकलाकाराला पुढे आणण्यासाठी उत्तम मार्गदर्शन केले. वर्धमानच्या कमी वयातील प्रभावी अभिनयाचे मराठी कलाकारांनी खास कौतुक केले आहे. वर्धमानला प्रसिद्ध टि.व्ही स्टार अभिनेते रॉकी, स्वीटू,ओम आदी दिग्गज कलाकारांसमवेत छोट्या बंड्याची भूमिका साकार करण्याची सुवर्णसंधी मिळाल्याने वर्धमानने खूपच आनंद व्यक्त केला. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेच्या काही भागांचे शूटिंग मालगुंड परिसरातील भंडारपुळे, वरवडे,जयगड तसेच कोंकणातील अतिशय निसर्ग आणि मंदिर परिसरात शूटिंग करण्यात आले. मालगुंड येथील मयेकर घराण्यातील हा पहिला बालकलाकार म्हणून त्याने आपले नाव अधोरेखित केले आहे.
वर्धमानला पर्यटन करणे, पोहणे, सायकलिंग, बोटिंग करण्याची फार आवड आहे.शिवाय तो आपल्या आई-बाबांबरोबर यापूर्वी दिल्ली, नैनिताल, नाशिक पुणे मुंबई भागातील अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद घेतला असल्याचे त्याने सांगितले.हा बालकलाकार सुनिल उर्फ बंधू मयेकर व कै. डॉ. नानासाहेब मयेकर यांचा नातू होय. आकलनशक्ती चांगली व धाडसी वृत्तीमुळे या कलाकाराला शिक्षणाबरोबरच अभिनयातही चांगली भरारी घेता येईल एवढे नक्की. ही मालिका झी मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री ८ वा.सुरू होते.