(गणपतीपुळे/वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे भर पावसात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा दुरुस्तीचा प्रस्ताव गेल्यानंतर या कामाला मंजुरी देण्यात आली. मात्र सध्या ज्या ठेकेदाराकडे हे काम देण्यात आले आहे, त्या ठेकेदाराकडून पावसात या इमारतीच्या दुरुस्तीचे काम केले जात असल्याने येथील येणाऱ्या सर्व रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे मालगुंड पंचक्रोशीतील स्थानिक ग्रामस्थांमधून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.
एकूणच येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील हॉलमध्ये मध्ये रुग्णांची तपासणी केली जात असल्याने मोठी गैरसोय निर्माण होत आहे. या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आता व्यक्त होत आहे. एकूणच मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पूर्णतः मोडकळीस आली असून नव्या इमारतीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे गेला आहे. परंतु या इमारतीची नव्याने उभारणी करण्याची गरज असताना सध्या करण्यात येणारा खर्च पूर्णतः वाया जाणार असून या वाया जाणाऱ्या खर्चाला जबाबदार कोण ? असा प्रश्न सध्या केला जात आहे. तसेच पावसाळ्यात या इमारतीची दुरुस्ती करून नेमके काय साध्य करणार असा प्रश्न देखील आता उपस्थित केला जात आहे.
या इमारतीच्या कामाबाबत जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ज्या इंजिनीअरला त्या दुरूस्ती कामाचे मूल्यांकन करण्यासाठी परवानगी दिली गेली. तसेच ज्या ठेकेदाराकडून हे काम केले जात आहे, अशा सर्वांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाकडून जर कुठल्याही हालचाली करण्यात आल्या नाहीत तर आपण या गलथान कारभाराविरोधात येत्या 15 ऑगस्टच्या दिनी आमरण उपोषणाला बसणार असल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शिंदे यांनी सांगितले आहे.