(गणपतीपुळे /वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावचे सुपुत्र आणि नामवंत नाट्य दिग्दर्शक व कलावंत, नाट्य समिक्षक,अभिनय मार्गदर्शक सदानंद भागोजी पवार यांचे मंगळवारी १९ डिसेंबर रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. “अण्णा” या टोपणनावाने ते सर्वत्र परिचित होते.
मालगुंड येथील आम्रपाली थिएटर्स ग्रामीण व मुंबईचे नामांकित दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम करताना आम्रपाली थिएटर्स च्या नाट्य क्षेत्राचा ( अभिनय कलेचा)ठसा गाव पातळीपासून मुंबईसारख्या मोठ्या शहरापर्यंत उमटविला. ते बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 17 तथा बौद्ध ग्रामस्थ मंडळ मौजे मालगुंड स्थानिक या मंडळाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सल्लागार म्हणून कार्यरत होते. तसेच रत्नागिरी तालुका शाखा बौद्धजन पंचायत समितीच्या अंतर्गत असलेल्या कला व क्रिडा समितीचे माजी चिटणीस व बावीस खेडी बौद्धजन सेवा संघ दीक्षाभूमी वाटद-खंडाळा संघटनेचे माजी सभापती म्हणून त्यांनी काम केले.
नाट्य क्षेत्रात काम करीत असताना त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकता कल्चर अकादमी मुंबई या मोठ्या संस्थेचा सर्वोत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक पुरस्कार प्राप्त झाला होता. सामाजिक, धार्मिक क्षेत्रात अत्यंत अग्रेसर आणि सक्रिय राहून त्यांनी काम केले.त्याचबरोबर इतरांच्या सुखदुःखात आणि वाडीतील प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणारे आणि सर्वांसाठी प्रिय असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. अत्यंत हसतमुख व प्रेमळ आणि लहानथोरांशी मनमोकळेपणाने वागणे असे त्यांचे व्यक्तीमत्व होते.तसेच संपूर्ण मालगुंड गावात त्यांचे व्यक्तीमत्व विशेष सुपरिचित होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सर्व क्षेत्रातील मंडळी, तालुका व बावीस खेडी संघाच्या गावशाखेतील पदाधिकारी व धम्मबांधव मोठ्या संख्येने अंत्ययात्रेसाठी उपस्थित होते.
मालगुंड बौद्धवाडी येथील स्मशानभूमीत २० डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता त्यांंचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवंगत सदानंद भागोजी पवार यांच्या पश्चात त्यांची पत्नी, भाऊ, दोन मुलगे, मुली, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.