(वैभव पवार / गणपतीपुळे)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कविवर्य केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती मालगुंड आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते सायंकाळी सहा या वेळेत “मना-मनातल्या श्रावण सरी” -एक मैफिल शब्दांची या काव्यमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती व कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड यांचे वतीने विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून नवोदित कवींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे व्हावे तसेच श्रावण, पाऊस आणि लहान ते थोरांच ओलचिंब भावविश्व मांडण्याचा एक प्रयास दाखविता यावा, या मूळ उद्देशाने मना-मनातल्या श्रावण सरी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक क्षेत्रातील रत्नागिरी येथील नामांकित मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच कोकण मराठी साहित्य परिषद शाखेचे काही मान्यवर कवी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची नियोजन बैठक नुकतीच कवी केशवसुत स्मारक येथे संपन्न झाली या नियोजन बैठकीत कोकण मराठी साहित्य परिषद मालगुंड च्या अध्यक्षा नलिनी खेर यांच्या मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली मना-मनातल्या श्रावण सरी या कार्यक्रमाचे अतिशय नेटके नियोजन करण्यात आले. यावेळी या बैठकीला कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन तथा आबा पाटील, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवाशक्तीचे प्रमुख अमेय धोपटकर, मालगुंड शाखेचे सचिव विलास राणे, जेष्ठ सदस्य राजेंद्र शिंदे, वैभव पवार, स्मिता बापट, सुरेखा कुलकर्णी, रमानंद लिमये, शुभदा मुळ्ये, उज्वला बापट आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषद मालगुंड च्या अध्यक्षा नलिनी खेर व कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन तथा आबा पाटील यांनी केले आहे