(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता दहावी अ च्या वर्गात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी कुमारी अस्मिता अजित दळवी हिने तिला सापडलेली सोनसाखळी कोणत्याही प्रकारचा मोह न ठेवता प्रामाणिकपणे मूळ मालकाला परत केली.
सदर विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना दुकानात खरेदी करण्यासाठी गेली होती. त्या ठिकाणी तिला काहीतरी जमिनीवर चकाकत असल्याचे तिच्या लक्षात आले, जवळ गेली असता ती सोनसाखळी असल्याचे दिसून आले. तिने ती तिथल्या दुकानदाराकडे घेऊन गेली व त्यांनी ती सोनसाखळी मालकाच्या स्वाधीन केली. कोणताही मनात मोह न बाळगता तिने अतिशय प्रामाणिकपणे दुकानदाराच्या माध्यमातून त्या मूळ मालकाला परत केल्यामुळे अस्मिताचे परिसरातून कौतुक होत आहे. तसेच प्रशालेच्यावतीने मुख्याध्यापक श्री नामदेव वाघमारे, पर्यवेक्षक श्री नितिन मोरे तसेच इतर शिक्षकांनी तिच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. तसेच शिक्षण संस्थेच्यावतीने सुद्धा तिचे कौतुक करण्यात आले.