(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड ग्रामपंचायत येथील प्रतिष्ठेच्या झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी मालगुंडचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शिंदे यांची बहुमताने निवड झाली आहे. तसेच मालगुंड ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समितीवर सलग चौथ्यांदा अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला आहे.
मालगुंड ग्रामपंचायतीची स्वातंत्र्य दिनानिमित्त होणारी विशेष ग्रामसभा तहकूब सभेनंतर गुरूवारी ३१ ऑगस्ट रोजी मालगुंड ग्रामपंचायतीच्या कविवर्य केशवसुत सभाग्रृहात मालगुंड ग्रामपंचायतीच्या सरपंच श्वेता खेऊर यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत तंटामुक्त समिती पुनर्घटित करण्याचा विषय आल्यानंतर तंटामुक्त समिती कायम ठेवण्यात यावी, असे उपस्थित ग्रामस्थांमधून सांगण्यात आले. त्यानंतर आयत्या वेळच्या विषयात मालगुंड ग्रामपंचायतीचे सदस्य सन्मान मयेकर यांनी गतवर्षी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष असलेल्या राजेंद्र शिंदे यांना अध्यक्षपदावर न ठेवता नव्याने अध्यक्षपदाची निवड करण्यात यावी,असे म्हणणे सभेच्या अध्यक्षांकडे मांडले. यावेळी हा विषय झालेला आहे,असे सांगण्यात आल्यानंतरही सन्मान मयेकर यांनी पुन्हा समितीच्या अध्यक्षपदी नव्याने निवड व्हायला पाहिजे,असे सांगितले.
त्यानुसार सभाग्रृहातून उपस्थित ग्रामस्थांना बोट उंचावून आपआपली पसंती दर्शविण्यात यावी,असे सभाध्यक्षांकडून सांगण्यात आले. यावेळी सन्मान मयेकर यांच्या बाजूने अवघ्या काही ग्रामस्थांचा पाठिंबा मिळाला.तर राजेंद्र शिंदे यांना सर्वाधिक ग्रामस्थांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे बहुमताने मालगुंड तंटामुक्त समितीच्या नव्या अध्यक्षपदी राजेंद्र शिंदे यांची निवड करण्यात आली. तसेच समितीतील सदस्यांची नावे कायम ठेवण्यात आली.
बहुमताने निवड झाल्याबद्दल राजेंद्र शिंदे यांचे मालगुंड ग्रामपंचायतीच्या सरपंच श्वेता खेऊर,उपसरपंच संतोष चौघुले,उपतालुकाप्रमुख प्रकाश जाधव,मालगुंडचे माजी सरपंच दीपक दुर्गवळी,युवा नेते साईनाथ जाधव, ग्रा.पं सदस्या शिल्पा पवार,स्मिता दुर्गवळी,शाखाप्रमुख दशरथ साळवी, बावा आग्रे, ग्राहक संरक्षक कक्षाचे उपसंघटक संजय दुर्गवळी,पत्रकार वैभव पवार,हरिनाथ शिवगण आदींसह अन्य शिवसैनिकांनी पुष्पगुच्छ भेट देऊन खास अभिनंदन केले.तसेच उपस्थित सर्वांच्या वतीने पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.