(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड ग्रामपंचायत आणि महात्मा गांधी तंटामुक्त समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मालगुंड गावातील तीन महसूल गावांसाठी नियुक्ती झालेल्या नवनिर्वाचित पोलीस पाटलांचा यथोचित सत्कार नुकताच विशेष ग्रामसभेचे औचित्य साधून करण्यात आला.
मालगुंड गावामध्ये चार महसूल गाव असून उर्वरित मालगुंड या महसूल गावासाठी सध्या शशिकांत पवार हे पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहेत तर मराठवाडी, रहाटागर, भंडारवाडा या तीन महसूल गावांसाठी पोलीसपाटील पद रिक्त होते. या तीन रिक्त असणाऱ्या महसूल गावांसाठी पोलीसपाटील म्हणून तीन जणांची नियुक्ती झाली आहे. त्यामध्ये मराठवाडी महसूल गावासाठी अमोल राऊत तर रहाटागर महसूल गावासाठी निधी संदेश मांडवकर आणि भंडारवाडा महसूल गावासाठी आस्था अतुल पाटील यांची नियुक्ती झाली आहे. या तिघांचाही सन्मान मालगुंड ग्रामपंचायतीच्या सरपंच श्वेता खेऊर, उपसरपंच संतोष चौगुले आणि मालगुंड तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी तीनही पोलीस पाटलांनी गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करून सर्वांच्या हितासाठी चांगले काम करू, अशी ग्वाही आपले मनोगत व्यक्त करताना दिली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी तीनही नवनिर्वाचित पोलीस पाटलांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला मालगुंड ग्रामपंचायत सरपंच श्वेता खेऊर, उपसरपंच संतोष चौगुले ग्रामविकास अधिकारी नाथाभाऊ पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांचेसह माजी सरपंच दीपक दुर्गवळी, सामाजिक कार्यकर्ते राजू साळवी, विलास राणे, शेखर खेऊर, रोहित साळवी आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समितीचे सदस्य व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.