( जाकादेवी / वार्ताहर )
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मालगुंड येथे सायकल बँक योजनेचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला असून मालगुंड शिक्षण संस्थेतर्फे मालगुंड विद्यालय व भाई मयेकर ज्युनिअर कॉलेजमधील ३१ गरजवंत विद्यार्थ्यांना सायकलींचे प्रत्यक्ष वितरण करण्यात आले.
सदरचा सायकल वितरण कार्यक्रम संस्थेचे उपक्रमशील चेअरमन सुनिल मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. नामदेव वाघमारे यांनी उपस्थित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. केंद्रीयमंत्री श्री.सुरेश प्रभू यांच्या फाउंडेशनच्या वतीने १० सायकली पुरविण्यात आल्या होत्या.या सायकलींची उपयुक्तता ध्यानात घेऊन या उपक्रमाची व्यापकता वाढविण्याच्या दृष्टीने प्रामुख्याने मालगुंड एज्युकेशन सोसायटीतर्फे चालू शैक्षणिक वर्षात आणखी २१ उत्तम दर्जाच्या नामांकित कंपनीच्या सायकली खरेदी करून मालगुंड प्रशालेत सायकल बँक योजना कार्यान्वित करण्यात आली.जे विद्यार्थी होतकरू- गरजू आहेत तसेच दूर गावातून शाळेत चालत येतात अशा विद्यार्थ्यांसाठी शाळेत येण्याचा प्रवास सुखकर व्हावा,यासाठी सायकल बँक योजनेच्या माध्यमातून ३१ सायकलींचे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले.
मालगुंड शिक्षण संस्थेचे धडाडीचे चेअरमन आणि सायकल योजनेचे संकल्पक संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांनी या सायकल बँक योजनेची संकल्पना व्यापक केली. मालगुंड शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मालगुंड प्रशालेतील ३१ होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना सायकलीचा प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला.
आम्ही शिक्षण संस्थाचालक व संस्था पदाधिकारी या नात्याने शालेय विद्यार्थी हिताचे शैक्षणिक व सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत जाऊ ,असा विश्वास देत पालकांनीही या योजनेला मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन बंधू मयेकर यांनी केले.
या शाळेतील सायकल बँक योजना ही रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलीच अशा प्रकारची योजना असल्याचे बंधू मयेकर म्हणाले. सायकल बँक योजनेच्या या अभिनव उपक्रमाचे उपस्थित पालकांनी खास कौतुक करून शिक्षण संस्थेला धन्यवाद दिले.विद्यार्थ्यांनी या वेळी आपल्या भावना व्यक्त करताना शाळा व संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाला मालगुंड शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर, संस्थेचे सचिव व शालेय प्रशासनाचे अभ्यासक तसेच मालगुंड विद्यालयाचे सी.ई.ओ.विनायक राऊत, खजिनदार श्री. संदीप कदम, संचालक श्री. आबा पाटील, संचालक व जाकादेवी विद्यालयाचे सी.ई.ओ.किशोर पाटील, संचालक श्री. विवेक परकर, श्री.शंकर आंबेकर, श्री. घनवटकर ,श्री.श्रीकांत मेहंदळे , श्री. दिवाकर पवार, मुख्याध्यापक श्री.नामदेव वाघमारे, पर्यवेक्षक श्री.नितीन मोरे, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अमित जाधव यांनी केले, तर आभार पर्यवेक्षक श्री.नितीन मोरे यांनी मानले.