( गणपतीपुळे / वैभव पवार )
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड बाजारपेठेतील श्री दत्त न्यूजपेपर एजन्सी तथा श्री दत्त जनरल स्टोअर्स चे मालक महेश वसंत बापट यांचे आज बुधवारी दुपारच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. ते 39 वर्षांचे होते.
महेश बापट यांनी आपले वडील कै.वसंत बापट यांनी पूर्वांपार सुरू ठेवलेला वृत्तपत्र विकण्याचा व्यवसाय अविरतपणे चालवून त्यांचा वारसा जपण्याचा प्रयत्न अतिशय तळमळीने व प्रामाणिकपणे केला.अतिशय साधी राहणी आणि अत्यंत शांत व प्रेमळ स्वभाव असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. मालगुंड परिसरातील एक तरूण होतकरू व्यावसायिक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. त्यामध्ये पेपर स्टॉलसारख्या लहान दुकानाचे जनरल दुकानात रूपांतर करून अन्य जोडधंदे जोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. मात्र अवघ्या 39 वर्षांच्या अल्पशा आयुष्यात त्यांचे आकस्मिक निधन झाल्याने खूप मोठी हळहळ मालगुंड परिसरात व्यक्त होत आहे. ते अद्याप अविवाहित राहिले होते. मात्र त्यांची काही स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच त्यांच्या कुटुंबीयावर खूप मोठा दुःखाचा प्रसंग ओढवला आहे.
त्यांच्या पश्चात मातोश्री, विवाहित बहीण, भागोजी,काकी, चुलत भाऊ,वहिनी असा परिवार आहे. दरम्यान,त्यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त समजताच रत्नागिरीतील विविध वृत्तपत्र कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांनी व मालगुंड परिसरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि स्थानिक व्यावसायिक व ग्रामस्थांनी भेट देऊन तीव्र शोक व्यक्त केला आहे. यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेसाठी सर्व स्तरावरील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.