( खेड )
तालुक्यात ऐन शिमगोत्सवातच ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. तालुक्यात व जिल्ह्यातील पाण्याचा पहिला टँकर पोसरे बुद्रुक – सडेवाडी येथे सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पहिला टँकर धावण्याची परंपरा यंदाही खेड तालुक्याने कायम ठेवली आहे.
दरड दुर्घटनेत पोसरे बुद्रुक – सडेवाडी येथील नळपाणी योजना जमिनदोस्त झाल्याने पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. २४ फेब्रुवारीला ग्रामस्थांनी टँकरसाठी पंचायत समितीकडे अर्ज केला होता. त्यानंतर शासकीय कागदोपत्रांची पूर्तता झाल्यानंतर प्रत्यक्ष टँकर सुरू करण्यात आला. उन्हाचा कडाका वाढला असून पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे टंचाईची तीव्रता पुढे अधिक वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षी ऐनवली-बंगालवाडी येथे तालुक्यातील पाण्याचा पहिला टँकर १४ फेब्रुवारीपासून धावला होता.
यावर्षी पोसरे बुद्रुक सडेवाडीला चोरद नदीपात्रातून एक दिवसा आड टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. यापाठोपाठ केळणे येथील भोसलेवाडी व मांगलेवाडी ग्रामस्थांनीही टँकरच्या पाण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. प्रशासनाकडून सर्वेक्षणानंतर पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.