(मुंबई)
म्हाडा प्राधिकारणाच्या कोकण आणि मुंबई मंडळाच्या प्रत्येकी ४ हजार अशी एकूण आठ हजार घरांसाठी लॉटरी मार्च महिन्यात निघणार आहे. मुंबई मंडळाच्या सुमारे ४ हजार घरांपैकी २ हजार ६०० घरे ही गोरेगाव पहाडी परिसरात आहेत. विशेष म्हणजे अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटांसाठी ही घरं बांधली जात आहेत. यातील अत्यल्प उत्पन्न गटातील घरांची अंदाजे किंमत ३५ लाख रुपये आहे. गृहनिर्माण बाजारपेठेत याच घरांची किंमत अंदाजे ७० लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते.
गेल्याच महिन्यात म्हाडाच्या पुणे मंडळाच्या घरांची लॉटरी जाहीर झाली. त्यात म्हाडाच्या कोकण मंडळाकडून मार्च महिन्यात घरांची लॉटरी काढली जाणार आहे. या लॉटरीसाठी येत्या आठवड्याभरात जाहीरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीत यंदा महत्वाची बाब म्हणजे, मार्च महिन्यात निघणाऱ्या या लॉटरीत अत्यल्प आणि अल्प आर्थिक उत्पन्न गटातील सर्वाधिक घर आहेत. विशेष म्हणजे ही घरे सर्व सुविधांनी सज्ज अशी असणार आहेत.
तर मुंबईमधील उर्वरित ठिकाणांवरील घरांचा समावेशही मुंबई मंडळाच्या लॉटरीत केला जाणार आहे. कोकण मंडळाची ही घरे ठाणे, वसई, विरार, पालघर, नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यांत असणार आहेत. यात मुंबई मंडळाच्या लॉटरीत गोरेगाव पहाडी येथे सर्वाधिक घरांचा समावेश आहे. अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च अशा चारही आर्थिक उत्पन्न गटांसाठी याठिकाणी घरं बांधली जात आहेत.
घरांचा आकार, किंमत आणि गट
गोरेगाव पहाडी परिसरात अत्यल्प उत्पन्न गटासाठी १ हजार ९४७ घरांचा समावेश आहे. ही घरे ३२२ चौरस फुटांची असून त्याची अंदाजे किंमत ३५ लाख रुपयांपर्यंत आहे. याच परिसरात अल्प उत्पन्न गटासाठी ७३६ घरे बांधली जात असून ही घरे ४८२ चौरस फुटांची आहेत. या घराची अंदाजे किंमत ४५ लाख आहे. गोरेगाव पहाडी परिसरात मध्यम उत्पन्न आणि उच्च उत्पन्न आर्थिक गटांसाठीही घरे बांधली जात आहेत. यात उच्च उत्पन्न गटासाठी १०५ घरं बांधली जात असून त्याचा आकार ९६० चौरस फुट एवढा आहे. तर मध्यम उत्पन्न गटासाठी २२७ घरे बांधली जात असून ती ८०० चौरस फुट एवढी आहेत.