( रत्नागिरी )
शहरातील मारुती मंदिर येथे पाच महिन्यांपूर्वी झालेल्या चोरीतील संशयिताला शहर पोलिसांच्या पथकाने मुंबईत अटक केली. त्याच्याकडून सुमारे ३ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयिताला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
बाबू दाऊद शेख (वय ३८, मुळ रा. रायपूर छत्तीसगड, सध्या रा. गोवंडी, मुंबई) असे त्या संशयिताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले, की याबाबत शशांक श्रीकृष्ण गांधी (वय ६८, रा. मारुती मंदिर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गांधी हे २० सप्टेंबर २०२२ ला कुटुंबासह बाहेरगावी गेले होते.
२६ सप्टेंबरला रत्नागिरीत परतले, तेव्हा त्यांना आपल्या बंगल्याच्या खिडकीचे स्लायडिंग उघडलेले दिसले. गज वाकवून चोरट्याने सोन्याचे दागिने, रोख रक्कमेसह ३ लाख २६ हजाराचा ऐवज चोरुन नेल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शहर पोलिस तपास करत होते. दरम्यान, यातील संशयित मुंबईत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळली.
पोलिस निरीक्षक विनित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली एक तपास पथक मुंबईला पाठवले. त्या पथकाने संशयित बाबू शेखला ताब्यात घेतले.