(मुंबई)
देशभर दिवाळीची धामधूम सुरु असतानाच या उत्साह व आनंदाच्या वातावरणावर विरजण टाकणारी बातमी डोंबिवलीतून आली आहे. घरगुती वादातून मामाने सख्ख्या भाच्याची चाकून भोसकून हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यश संजय तिवारी (वय २२) असे हत्या झालेल्या भाच्याचे नाव आहे. तर सतीश राजनारायण दुबे (वय ३१) असे आरोपी मामाचे नाव आहे.
ही घटना डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा भागातील विनायक कुंडल सोसायटीत घडली. येथे मामाने रागाच्या भरात आपल्या भाच्याची धारदार चाकूने राहत्या घरात कुटुंबीयांच्या समोरच हत्या केली आहे. दिवाळीच्या दिवशी हा प्रकार घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार,आरोपी सतीश हा बहिण सरिता तिवारी यांच्या घरीच रहात होता. सरिता यांच्या घरात तिचा पती, मुलगा यश व सरिताचे वडील आणि आरोपी सतीश असेचार जण एकत्र रहात होते. घरगुती वादातून सतीशने वडील आणि सरिताचा पती संजय यांच्याशी भांडण सुरू केले. शिवीगाळ करुन तो दोघांना मारहाण करण्यास धावत होता. भांडण सोडविण्यासाठी भाचा यश याने हस्तक्षेप केला. त्याचा राग सतीशला आला. त्याने रागाच्या भरात स्वयंपाक घरातील धारदार चाकूने यशवर सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या यशचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.