जाकादेवी /वार्ताहर :- रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयाला रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी सदिच्छा भेट दिली . यावेळी निशादेवी वाघमोडे यांचे शाळा व शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे विद्यमान चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड ,विस्तार अधिकारी गोपाळ चौधरी,अधिक्षक श्री. चौगुले तसेच शिक्षण संस्थेचे सचिव विनायक राऊत , सी.ई.ओ.किशोर पाटील, संस्थेचे सल्लागार नंदकुमार साळवी,संचालक श्रीकांत मेहेंदळे, प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे सचिव रोहित मयेकर आदी उपस्थित होते. यावेळी शिक्षणाधिकारी यांनी उपस्थितांना शैक्षणिकदृष्ट्या बहुमोल मार्गदर्शन केले. त्यानंतर निशादेवी वाघमोडे यांनी गुहागर तालुक्यातील काजुर्ली येथील डॉ.नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालयाच्या नवीन शालेय इमारतीला भेट दिली.काजुर्लीतील शिक्षणप्रेमी ग्रामस्थांशी संवाद साधला.तसेच डॉ. नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय,काजुर्ली विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. यावेळी निशादेवी वाघमोडे यांनी इ.९ वी व इ.१० वी च्या वर्गात प्रत्यक्ष जाऊन गणित विषयाचा अप्रतिमरित्या पाठ घेतला .चौकोनाचे प्रकार व पायाभूत संकल्पना या घटकांवर त्यांनी अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना वाघमोडे म्हणाल्या की,गणिताचे बेसिक नॉलेज अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी या संकल्पना आवडीने समजून घेणे गरजेच्या असल्याचे त्या बोलल्या. यावेळी वाघमोडे यांनी इंग्रजी,हिंदी ,भूगोल या विषयांना स्पर्श करत या विषयातील बेसिक घटकांवर चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. नवनवीन संकल्पना समजून घ्याव्यात तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यासाविषयी भीती मनात ठेवू नये, आत्मविश्वासाने अभ्यास करा व ज्ञानाच्या कक्षा वाढवा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी त्यांच्यासमवेत उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड,विस्तार अधिकारी गोपाळ चौधरी, अधीक्षक श्री.चौगुले, मालगुंड शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर संस्था सचिव विनायक राऊत,संचालक व सी.ई.ओ. किशोर पाटील ,प्रशालेचे मुख्याध्यापक अमोल पवार ,काजुर्लीतील कैलास साळवी,आबा खानविलकर यांसह दानशूर ग्रामस्थ,शिक्षणप्रेमी,शिक्षक उपस्थित होते. यावेळी नव्याने उभारण्यात आलेल्या डॉ. नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात शिक्षणाधिकारी तसेच उपशिक्षणाधिकारी यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. डॉ. नानासाहेब मयेकर यांच्या नावाने मयेकर कुटुंबियांनी भव्यदिव्य साकारलेली शालेय नवीन इमारत पाहून मालगुंड शिक्षणसंस्थेचे व खास करुन मयेकर कुटुंबियांचे माध्यमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांनी खास कौतुक केले.