(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील वाटद व संदखोल केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल गोविंद पवार यांची माध्यमिक विभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री.अनिल पवार यांनी १० वर्षे शिक्षक म्हणून तर २८ वर्ष केंद्रप्रमुख म्हणून अतिशय निष्ठेने काम केले आहे. गेली ३८ वर्षे शिक्षण क्षेत्रात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते नेहमीच आग्रही असतात.
शालेय व केंद्र स्तरावर अनेक उपक्रम राबविण्यावर त्यांचा सातत्याने भर असतो.आधुनिक स्पर्धेत ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकून राहण्यासाठी त्यांनी अनेक स्पर्धांत्मक उपक्रम राबविले.शिक्षक-पालक तसेच शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी त्यांची नेहमीच समन्वयाची भूमिका असते. शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, उल्लेखनीय कामगिरी व सेवा ज्येष्ठता लक्षात घेऊन अनिल गोविंद पवार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी यांनी माध्यमिक विभागात शिक्षण विस्तार अधिकारी पदी नियुक्ती केली आहे.
या निवडीबद्दल केंद्रप्रमुख अनिल पवार यांचे वाटद व संदखोल केंद्रासह रत्नागिरी तालुक्यातून अभिनंदन होत आहे.