(मुंबई)
गोपीनाथ मुंडेंपेक्षा जास्त संघर्षाची वेळ आपल्यावर आली. माझ्याविरोधात कोणीही अफवा उठवू नये. ईश्वर न करो आयुष्यात यामुळे मला काही निर्णय घेण्याची वेळ येवो, असा निर्णय घेणे हे खूपच दु:खदायक असते, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली आहे.
पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाकडून नुकतीच कारवाई करण्यात आली, या पार्श्वभूमीवर त्या एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. माझ्याविरोधात अफवा उठवू नये, मला जेव्हा आयुष्यात काहीपण निर्णय घ्यायचा असेल तर ईश्वर करो ती वेळ येऊ नये. विवाहबंधनासारखे संघटनेशी आपले बंधन असते. नकळत आपण एका आयडॉलॉजीवर प्रेम केलेले असते. त्यामुळे असा निर्णय कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात घ्यावा लागणे हे दुख:दायक असते. असा निर्णय कोणालाही घ्यायची वेळ येऊच नये, अशी ईश्वर चरणी प्रार्थना आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, “जीएसटी विभागाने काही महिन्यांपूर्वी परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर छापा टाकला. त्यावेळी मी त्यांच्या कामात कोणताही अडथळा येऊ दिला नाही. तसेच माझी माणसं पाठवून कार्यालय उघडले. संबंधित अधिकाऱ्यांना सर्व कागदपत्रे दिली. अधिकाऱ्यांना ज्या आकड्यांबाबत शंका होती. त्यामध्ये काहीही तफावत आढळली नाही.” मी आर्थिकदृष्ट्या प्रचंड तणावातून जात असून दररोज बँकांच्या पाया पडतेय, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी आपली व्यथा मांडली आहे.
शहांची अद्याप वेळ नाही
दरम्यान, अमित शहा यांना आपल्या मनातील खदखद बोलून दाखवायची आहे. पण त्यांनी अद्याप वेळ दिलेली नाही, असेही त्यांनी सांगितले. पंकजा म्हणाल्या, अमित शहा जेव्हा वेळ देतील, तेव्हा त्यांना मी भेटेन. आता तर सत्तेत आणखी एक पार्टनर आहे, त्यामुळे राजकीय गणिते बदलली आहेत, असेही त्या म्हणाल्या.
ती कारवाईच, बावनकुळेंना माहिती नाही
कोणत्याही सहकारी कारखान्याला नोटीस पाठवली असेल तर त्याला उत्तर देता येते. नोटीस पाठवणे हे तपास यंत्रणांचे काम आहे, त्याला उत्तर दिले की, नोटिसा रद्द होतात. जर ऑडिटमध्ये काही गडबड झाली असेल तर पंकजा मुंडे त्याला उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया वैद्यनाथ कारखान्यावरील कारवाईवर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली होती. पण त्यांच्या या मताशी पंकजा मुंडे सहमत नसल्याचे दिसून आले, कारण ही नोटीस नाही कारवाई आहे. त्यांना मी काय बोलू, त्यांना याची योग्य माहिती नाही, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला.