(पाचल / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल हे सर्व सुखसोई व इतर अनेक सुविधा असलेलं गावं म्हणून ओळखलं जातं. या गावाला गावच्या ग्रामपंचायतला काल मंगळवार दिनांक 9 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री अजित यशवंतराव यांनी भेट दिली.
जवजवळ दीड तास चाललेल्या या चर्चेत पाचल गावचा विकास व इतर महत्वाच्या गोष्टी वर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान बोलताना ते म्हणाले ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच यांच्या विनंतीला मान देऊन या नवीन नवनिर्वाचित कमिटीचा सन्मान स्वीकारायचं मला आज भाग्य मिळालं त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. माझं आणि पाचल गावचं एक पारिवारिक नातं असल्याने ही सर्व मंडळी मला हक्काने व अधिकाराने केव्हाही बोलवू शकतात आणि ज्या ज्या वेळी बोलावतील त्या त्या त्यावेळी मी त्यांच्यासाठी केव्हाही उपलब्ध असेन.
पाचल गावच्या विकासात्मक विषयावर चर्चा केली असता या चर्चेत सर्व ग्रामपंचायत कमिटी मेंबर व ग्रामस्थ उपस्थित असल्याने ही चर्चा चांगल्या प्रकारे घडून आली त्यामुळे आम्ही देखील त्यांना विश्वास दिलाय की पाचलच्या विकासासाठी ज्या ज्या वेळी आमची मदत लागेल त्या त्या वेळी आम्ही त्यांच्या सेवेसाठी केंव्हाही तत्पर राहू असं यावेळी छोटेखानी चर्चेत त्यांनी वचन दिलं.
पाचल तालुका व्हावा यासाठी पाचल गावचे ग्रामस्थ गेली 40 वर्षे प्रयत्नात आहेत. याबाबत बोलताना गेली अनेक वर्ष या परिसरामध्ये पाचल असेल रायपाटण असेल या गावांच्या परिसराला राजापूर तालुक्यातील या भागाला एक वेगळा तालुका मिळाला पाहिजे अशी मागणी आहे आणि या मागणीला आता पुन्हा एकदा जोर पकडू लागला आहे अशी दबक्या आवाजात चर्चा चालू आहे. त्यामुळे याबाबत शासन दरबारी चर्चा करून सदर मागणीसाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.
राजापूर तालुक्यातील बारसू प्रकल्पाबाबत विचारलं असता त्यांनी, रिफायनरी प्रकल्पाला मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा विरोध दर्शविला जात आहे.यावेळी आम्ही देखील जे प्रकल्पग्रस्त गावं आहेत त्यांच्यासोबत आहोत.फक्त एक सांगावंसं वाटतं की विरोध करीत असताना तिथल्या जनतेला विश्वासात घेऊनच प्रकल्प आणला पाहिजे.त्या ठिकाणची मूलभूत सुविधा काय? लोकांच्या मागण्या काय? त्यांचं म्हणणं काय?हे शासनाने-प्रशासनाने ऐकून घेऊनच याबाबत योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. असं या प्रकल्पा बाबत स्पष्टीकरण देताना म्हणाले.
अनेक विषयावर झालेल्या या चर्चेदरम्यान ग्रामपंचायत पाचल कार्यलयात सरपंच श्री बाबालाल फरास, उपसरपंच श्री आत्माराम सुतार, ग्रामपंचायत सदस्य श्री संजय पाथरे, श्री विनायक सक्रे,श्री कासम गडकरी, श्री नफिस बोबडे, सौ प्रियांका नारकर, व्यापारी संघटना अध्यक्ष व राष्ट्रवादी जिल्हा चिटणीस श्री आण्णा पाथरे, माजी महिला सभापती सौ धनश्री मोरे, ग्रामस्थ श्री सिद्धार्थ जाधव, बाबू आजीवलकर, श्री फिरोज टिवले, ठेकेदार श्री हसन पाठणकर व पाचल गावचे सुपुत्र आणि अजित यशवंतराव यांचे स्वीय साह्ययक श्री.विहंग खानविलकर आदी उपस्थित होते. या चर्चेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे सरपंच श्री बाबालाल फरास व उपसरपंच श्री आत्माराम सुतार यांनी सर्वांचे आभार मानले