(मुंबई)
आजकाल हृद्यविकाराचा त्रास हा प्रत्येक वयोगटामध्ये दिसून येत आहे. मुंबईच्या मुलुंड भागात एका महिलेला 16 महिन्यात 5 ह्दयविकाराचे झटके आले आहेत. या महिलेने या पाचही हृद्यविकाराच्या झटक्यात मृत्यूला चकवा दिला आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्र चक्रावून गेले आहे. दरम्यान ही महिला 51 वर्षीय असून तिच्यावर 6 वेळा अँजिओप्लास्टी झाली आहे, तर एकदा ओपन हार्ट बायपास शस्त्रक्रिया झाली आहे. महिलेला पाच स्टेंट बसवण्यात आले आहेत.
सप्टेंबर 2022 मध्ये ही महिला जयपूर वरून बोरिवलीला येत असताना पहिला हृद्यविकाराचा झटका आला. त्यावेळी अहमदाबादमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार करण्यात आले. मात्र प्राथमिक उपचारांनंतर अॅन्जिओप्लास्टी साठी त्यांनी मुंबई गाठली. मुलूंडच्या फोर्टिस मध्ये तिच्यावर उपचार झाले.
या महिलेवर दोन अँजिओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया झाल्या असून जुलै महिन्यापासून तिच्यावर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. तिच्या हृदयातील समस्येचं कारण एक गूढच असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. अनेक डॉक्टरांसह तज्ज्ञांचा असा विश्वास आहे, की व्हॅस्क्युलायटिससारख्या स्वयं-प्रतिकारक रोगात रक्तवाहिन्या फुगतात आणि अरुंद होतात, परंतु चाचण्यांमध्ये अद्याप कोणतेही स्पष्ट निदान झालेले नाही.