( चिपळूण / प्रतिनिधी )
चिपळूण महिलेचे दागिने लुटण्याचा प्रकार घडत असताना रिक्षा चालकांच्या चाणाक्षपणामुळे हाणून पडला आहे. मात्र भुरटे चोर पळून जाण्यात यशस्वी ठरले.
सविस्तर वृत्त असे की, चिपळुणात एक महिला मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कामावर जात होती. चालत जात असताना ती चिपळुणातील पॉवर हाऊस येथे आली असता एका दुचाकीवरून तिघेजण आले. त्या तिघांनी महिलेला दागिने काढण्यास सांगितले. महिलेने ते काढण्यास सुरुवात केली. एवढ्यात रिक्षा स्टॉप वर असलेल्या रिक्षा चालकांनी पाहिले. त्यांच्या सारा प्रकार लक्षात आला. महिलेला लुटत असल्याचे त्याच्या लक्षात आले. याबरोबर लगेच रिक्षा चालकांनी जागेवरून ओरडायला सुरुवात केली. रिक्षा चालकांच्या आवाजाने घाबरलेले चोरटे धूम ठोकुन पळून गेले. या प्रकारानंतर महिलेने सुटकेचा निःश्वास टाकला. आपण मोठ्या फसवणुकीला बळी पडलो असतो याची जाणीव झाली. सुदैवाने रिक्षा चालकांनी लक्ष घातल्यामुळे पुढील अनर्थ टळाला. तिने रिक्षा चालकांचे आभार मानले. ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिस स्थानकात तक्रारच दाखल करण्यात आलेली नाही.