(मुंबई)
गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये विलंब झाल्यास ग्राहकाला सोसावा लागणारा आर्थिक फटका, मनस्ताप, कालापव्यय आदींबद्दल महारेराकडून बिल्डरांवर केली जाणारी कारवाई आता सुरू करण्यात आली आहे. यापैकीच एन. के. गार्डनचे विकासक भूपेश बाबू यांच्या मालमत्तेचा लिलाव महारेराने करून त्या प्रकरणातील ३४ तक्रारदारांना ४ कोटी ७८ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
लिलावातून पैसे वसूल करून तक्रारदारांना नुकसानभरपाई मिळण्याची ही पहिलीच घटना आहे. राज्यात आणखी काही ठिकाणी मालमत्ता जप्ती आणि लिलाव जाहीर होणार आहेत. महारेराने केलेल्या कारवाईंतर्गत २० एप्रिल रोजी पनवेल क्षेत्रातील मोरबी ग्रामपंचायतीत एन.के. गार्डनचे भूपेश बाबू यांच्या मालमत्तांचा लिलाव झाला होता. यात ३१ लाख ५७ हजार ही सर्वात जास्त नुकसानभरपाईची रक्कम आहे. तर ३ लाख ४८ हजार सर्वात कमी रक्कम आहे. याशिवाय ३४ पैकी ३० तक्रारदारांना तक्रारीचा खर्च म्हणून एकूण ६ लाख रुपये देण्यात आले. भूपेश बाबू यांच्या मालमत्तांच्या लिलावात, या प्रकरणातील आधारमूल्य ३.७२ कोटी असताना लिलावात ४.८२ कोटींची बोली लागली. त्यामुळे ३४ तक्रारदारांना नुकसानभरपाईची मुद्दल रक्कम अदा करण्यात आली.