(मुंबई)
मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाद पेटल्याचे चित्र दिसत आहे. बीड, परभणी या भागात आंदोलनला गेले दोन दिवस हिंसक वळण लागले आहे. काही नेत्यांची घरं, कार्यालये यांना आग लावण्यात आली. अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली आहे. आजही काही ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला आहे. राज्यात सध्या चिंताजनक परिस्थती असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्तीसगडमधील रायपूरच्या भाजप कार्यालयात बैठक घेत आहेत. यावर आता राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार यांनी ट्वीट (एक्स) करत लिहीले की, “आज सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्र होरपळतोय… पण ही आग विझवण्याचं सोडून आपले गृहमंत्री छत्तीसगड भाजप राजकीय आगीत खाक होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून तिकडं जातात… कधी कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं, हे देवेंद्र फडणवीस साहेब आपल्यासारख्या नेत्याला नक्कीच कळत असणार.. तरीही महाराष्ट्र जळताना तो शांत करण्याऐवजी तुम्ही इतर राज्यात जाऊच कसं शकतात?”
“एकीकडे मनोज जरांगे पाटील शांततेचं आवाहन करत आहेत. पण गृहमंत्री असूनही महाराष्ट्र जळत असताना तुम्ही इतर राज्यात निघून जाता. याचा अर्थ या जाळपोळीच्या घटनांची तुम्ही अप्रत्यक्षरीत्या पाठराखण करता, असं आम्ही समजायचं का?” असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. यावेळी त्यांनी काही स्क्रिनशॉट देखील शेअर केले आहेत.