(संगलट / इक्बाल जमादार)
बई-गोवा महामार्गाची दुरवस्था आणि त्यावर होत असलेल्या अपघातांच्या घटनांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी नागपूर अधिवेशनात टीका करत राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. १२ वर्षे झाल्यानंतरही या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप आमदार जाधव यांनी केला.
मुंबई-गोवा महामार्गावर मोठे खड्डे पडले असून, १० वर्षांत या रस्त्यावर २०१० जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. १२ वर्षे झाली तरी आतापर्यंत फक्त ६७ टक्के काम या रस्त्याचे झाले असल्याचे वास्तव समोर आले आहे. रस्त्याच्या कामाबद्दल केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची अनेकदा भेट घेतली. मात्र अद्यापही हा रस्ता पूर्ण झालेला नाही. या रस्त्याची नक्की अवस्था काय आहे? कोकणातील मंडळी यावरून कसा प्रवास करतात, याचा अनुभव घ्यायचा असेल तर त्यांनी एकदा या रस्त्यावरून प्रवास करून दाखवावा, असे आव्हान जाधव यांनी दिले.
खात्याचे अधिकारी गडकरी यांना चुकीची माहिती देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कोकणातील आमदारांमध्ये एकी नसल्याने या रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्याचेही जाधव म्हणाले. “हा रस्ता वेळेत झाला नाही याला मी जबाबदार असून यासाठी मी इतर कोणालाही जबाबदार धरणार नाही”, अशी भीमगर्जना केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. या रस्त्यासाठी मी तब्बल ८० बैठका घेतल्या; मात्र मला यश आले नाही. सर्व भारतात मला रस्ते बांधण्यासाठी त्रास झाला नाही; पण मुंबई-गोवा महामार्ग मला दिलेल्या वेळेत पूर्ण करता आला नाही याचे मला दुःख आहे, असेही नितीन गडकरी यांनी अनेकदा बोलून दाखवले आहे, असे आमदार जाधव यांनी सांगितले.