(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्द्यावरून मनसेने राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पनवेलमध्ये निर्धार मेळावा घेतला होता. त्यानंतर मनसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राजापूर तालुक्यातील हातिवले टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. यानंतर आता रत्नागिरीतील पाली खानू मधील हॅन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे ऑफीसही मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडले आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेच्या मुद्द्यावर मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे.
दरम्यान पनवेलच्या निर्धार मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्याच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर सणकून टीका केली. राज ठाकरेंनी आदेश दिल्यानंतर रत्नागिरीत मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणाऱ्या हॅन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचं कार्यालय मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडले आहे. या अगोदर रायगडच्या माणगावमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई- गोवा महामार्गाचं काम करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. माणगावमधील चेतक सन्नी कंपन कार्यालय फोडले होते. त्यामुळे आता टोलवरुन आणि मुंबई-गोवा महामार्गच्या मुद्द्यावर मनसेचं खळ्ळखट्याक सर्वत्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे.