(खेड)
मुंबई-गोवा महामार्गावरील आवाशीनजीक भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत गुरुवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास नर सांबराचा मृत्यू झाला.
महामार्गावर वन्यप्राणी असल्याचे निदर्शनास आल्याने सचिन खोपकर यांनी सकाळी ७.०० वा स्थानिक वन अधिकारी यांना दूरध्वनीव्दारे कळविले. वनविभागाला ही बातमी प्राप्त होताच ७.३० चे दरम्यान घटनास्थळी वनक्षेत्रपाल दापोली पी. जी. पाटील व त्याचे कर्मचारी यांनी पाहणी केली तेव्हा सांबर मृत अवस्थेत दिसून आले. सांबराचे वय ७ ते ८ वर्ष असावे, वाहनाचा जोरदार धक्का बसल्याने सदर सांबर मृत झाल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले.
हरणाच्या तोंडाला मार लागुन रक्त स्त्राव होत होता. तर पाठीमागील उजव्या पायावरती खरचटलेल्या खुणा दिसुन आल्या. मृत सांबर ताब्यात घेवुन पशुवैद्यकीय अधिकारी खेड यांच्याकडून तपासणी केल्यावर सकाळी पहाटे चे चार ते पाचच्या सुमारास ही घटना घडली असावी असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.