(रत्नागिरी)
खासदार विनायक राऊत यांनी मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम व नादुरुस्त झालेल्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांची घेतली भेट घेतली.
गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ ला मंजूरी दिल्यानंतर पोलादपूर ते खेड आणि पुढे वाकेड (ता. लांजा) ते झाराप, जि. सिंधुदुर्ग पर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम ९५% पूर्ण झाले आहे. परंतु चिपळूण परशुराम घाट ते वाकेड (ता. लांजा) हा रस्ता मात्र मागच्या अनेक वर्षापासून ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे आणि निष्क्रियतेमुळे मृत्युचा सापळा बनला आहे. चिपळूण शहरातील उड्डाणपुलाचे काम अत्यंत कुर्मगतीने सुरू आहे, तर लांजा येथील उड्डाण पुलाचे काम मागील चार वर्षांपासून पूर्णपणे बंद आहे. तसेच चिपळूण परशुराम घाटातील रस्ता रेषा सखोल अभ्यासाअंती निश्चित न केल्यामुळे चौपदरीकरणाच्या कामावेळी परशुराम घाट एका बाजूने कोसळण्यास सुरूवात झालेली आहे.
यावर्षी सुध्दा कोकणामध्ये अतिवृष्टी झाली आणि परशुराम घाट ते वाकेड (ता. लांजा) दरम्यानचा सुमारे 100 कि.मी. लांबीचा रस्ता मृत्युचा सापळा बनला आहे. हजारोंच्या संख्येने असलेल्या खड्ड्यांतून वाहनचालकांना वाहने चालविणे अत्यंत मुश्किल होऊन गेले आहे. दुचाकी वाहने चालुच शकत नाहीत अशी अवस्था झालेली आहे.
ही समस्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ चे वरिष्ठ अधिकारी यांच्या मी निदर्शनास वारंवार आणली. परंतु ठेकेदाराचे सहकार्य मिळत नसल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ ची ही दुरावस्था संपत नाही.
सध्या, श्री गणेश चतुर्थी उत्सव जवळ आला असून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या भागातील लाखो कोकणवासीय आपल्या वाहनाने रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये येतात. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वरील रस्त्यांचा त्रास या चाकरमानी मंडळींना नक्की होणार आहे.
त्यामुळे आपण तातडीने मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ चे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांची बैठक आयोजित करावी व मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ चे रखडलेले काम व गणपतीपूर्वी महामार्ग खड्डे मुक्त सुरक्षित करण्याचे सक्तीचे आदेश सर्व संबंधितांना द्यावेत व चाकरमानी मंडळींचा कोकणातील प्रवास सुखकर करावा, अशी भेट घेवून त्याबाबतची मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.