(मुंबई)
महापालिका निवडणुकीसंबंधीचे प्रकरण न्यायालयात आहे. आमच्या हातात काहीच नाही, मात्र आम्ही कधीही महापालिका निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले. काही जण आधी उच्च न्यायालयाला सल्ले देत होते. आता ते सर्वोच्च न्यायालयालाही सल्ले देऊ लागल्याचा टोलादेखील शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
राज्यातील सरकार कधीही पडू शकते. हे घटनाबाह्य सरकार आहे. महापालिका निवडणुकीत ते सपशेल आपटतील, अशी टीका महाविकास आघाडीकडून सातत्याने होत असते. त्याला प्रत्युत्तर देताना शिंदे म्हणाले की, महापालिका निवडणुकीसंबंधीचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालय जो निकाल देईल तो देईल. आमच्या हातात काहीच नाही, मात्र आम्ही कधीही निवडणुकीसाठी तयार आहोत. हे केवळ ४-५ महिन्यांमध्येच इतके करू शकतात. यांना जर संधी दिली तर काय करतील हे आमच्याबाबत लोकांना कळून चुकले आहे.
मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. खड्डे तसेच ठेवले असते तरी टीका झाली असती. म्हणून सत्तेत येताच मुंबईला खड्डेमुक्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आम्ही काम करीत नाहीत. लोकच ठरवतात की कोण कामाचा आहे आणि कोण बिनकामाचा ते. आमचे सरकार कायद्यानुसार स्थापन झाले आहे. देशाला घटना आहे, नियम आहे. बहुमताला स्थान आहे. आमच्याकडे ५० आमदार आणि १३ खासदार आहेत.
आमचे सरकार गुणवत्तेवर आणि नियमानुसार स्थापन झाले आहे. न्यायालय पुरावे आणि वस्तुस्थिती पाहत असते. त्यामुळे गुणवत्तेवर निर्णय व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. न्यायालयाबाबत मी कधीच प्रतिक्रिया देत नाही, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.